सावंतवाडीतील दुहेरी हत्याकांडमधील संशयितास जामीन, दोन वर्षानंतर येणार बाहेर
By अनंत खं.जाधव | Published: November 6, 2023 04:39 PM2023-11-06T16:39:31+5:302023-11-06T16:39:49+5:30
सावंतवाडी : सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाजलेल्या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी याला अखेर जिल्हा न्यायालयाने ...
सावंतवाडी : सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाजलेल्या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी याला अखेर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे हत्याकांड कर्ज बाजारीपणातून घडल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. या प्रकरणी 14 नोव्हेंबरला संशयिताला अटक करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षानंतर संशयित जामीनावर बाहेर येणार आहे.
सावंतवाडी शहरात 30 ऑक्टोबर 2021 मध्ये उभाबाजार येथे दुहेरी हत्याकांड घडले होते. यात नीलिमा नारायण खानविलकर व शालिनी सावंत या दोघा महिलांचा खून करण्यात आला होता. हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तब्बल पंधरा दिवसानंतर म्हणजेच 14 नोव्हेंबर 2021 ला खानविलकर यांच्या शेजारी राहात असलेल्या कुशल टंगसाळी याला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते.
त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 8 ग्रॅम सोन्यासाठी हे हत्याकांड केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आले होती. या पार्श्वभूमीवर संशयित तब्बल दोन वर्षे न्यायालयीन कोठडीत होता. अखेर त्याला सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याकामी अॅड.स्वप्निल कोलगावकर व अॅड.संकेत नेवगी यांनी काम पाहिले होते.