संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्हा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 12:11 PM2020-08-31T12:11:16+5:302020-08-31T12:12:39+5:30
बनावट शिक्के वापरून बनावट परवाना तयार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहबाज आलम अब्दुल सलाम याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांंनी नामंजूर केला आहे.
ओरोस : कोरोना प्रतिबंधात्मक कालावधीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे पोलीस अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के वापरून बनावट परवाना तयार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहबाज आलम अब्दुल सलाम (२१, मूळ राहणार उत्तरप्रदेश, सध्या राहणार नालासोपारा) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांंनी नामंजूर केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची स्थिती असताना परजिल्ह्यात किंवा परराज्यात चारचाकी वाहनाने परवानगीशिवाय जाण्या-येण्यास शासनाने प्रतिबंध केला होता. अत्यावश्यक सेवेतील वाहनांंव्यतिरिक्त अंत्यविधी व वैद्यकीय सेवा इत्यादी आपत्कालीन कारणांंसाठी नागरिकांना प्रवासी पास स्थानिक प्रशासनाकडून घेणे बंधनकारक करण्यात आले होते.
दरम्यान, मुंंबईकर चाकरमान्यांंना गावी येण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सही-शिक्क्यांचे बनावट पास बनवून देणाºया टोळीचा पर्दाफाश मुंंबई क्राईम ब्रँच आणि सिंधुदुर्ग पोलीस यांंच्या संयुक्त पथकाने केला होता. या प्रकरणी सर्फराज हसन शेख (३८), समीर शमशुद्दीन शेख (३६), नूर मोहम्मद शेख (३०, सर्व रा. हडी-मालवण) तसेच शहबाज आलम अब्दुल सलाम (२१) यांंच्यावर अनेक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील सर्फराज शेख याला २५ जुलै रोजी अटक झाली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. तर त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यामुळे सद्यस्थितीत तो न्यायालयीन कोठडीत आहे.
त्यानंतर शहबाज आलम अब्दुल सलाम या संशयिताला ३० जुलै रोजी अटक करण्यात आली होती. सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत असलेल्या या संशयिताने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.
शहबाज याने बनावट पास बनवून दिल्याची बाब पोलीस तपासात निष्पण्ण झाली आहे. हे पास बनावट असल्याचा अभिप्राय बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त यांंनी दिला आहे. तसेच पास खरे आहेत हे भासविण्यासाठी त्याने बृहन्मुंबई पोलिसांच्या लोगोचा व ड्युटी कमिशनर पोलीस यांंच्या गोल शिक्क्याचा तसेच सहीचा गैरवापर केला असल्याची बाब समोर आली .
त्यामुळे संशयिताने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. शिवाय तो मूळचा उत्तरप्रदेश येथील राहणारा असल्याने पुन्हा मिळणे मुश्किल अशी शक्यता नाकारता येत नाही. अन्य दोन आरोपींंना अटक करणे बाकी आहे. त्यामुळे याला जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली होती अशी माहिती अॅड. तायशेटे यांंनी दिली. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यांंनी काम पाहिले.