शाखाप्रमुख निलंबित अन् बंडखोर?

By admin | Published: September 6, 2015 10:33 PM2015-09-06T22:33:57+5:302015-09-06T22:33:57+5:30

नाचणे ग्रामपंचायत : शाखाप्रमुखाच्या सदस्यत्वाबाबत प्रश्नचिन्ह...

Suspended and rebel branch? | शाखाप्रमुख निलंबित अन् बंडखोर?

शाखाप्रमुख निलंबित अन् बंडखोर?

Next

रत्नागिरी : तालुक्यातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या नाचणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पक्षादेश धुडकावल्याने शाखाप्रमुखावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निवडणुकीत पक्षादेश धुडकावून बंडखोरी करणाऱ्या उपसरपंचांचे पद अद्याप तसेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बंडखोरांवर कारवाई होणार की अभय देणार, असा सवाल केला जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पंधरा दिवसांपूर्वीच झाली. नाचणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्व १७ सदस्य विजयी झाले होते. त्यामुळे सरपंच, उपसरपंच निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांनी आपली पत्नी जयाली घोसाळे यांच्या नावासाठी आग्रह धरला. त्याचवेळी मंदा ठीक यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसेनेतीलच एका गटाने आग्रह धरला होता. त्यामुळे अंतर्गत वादाची ठिणगी पडली होती. यावर तोडगा काढण्यासाठी बैठकांवर बैठका घेण्यात आल्या. अखेर जयसिंग घोसाळे यांनी आपले राजकीय वजन वापरून पत्नीसाठी उमेदवारी मिळवून सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध केली.
त्याचवेळी उपसरपंचपदासाठी सेनेत नव्याने दाखल झालेले आमदार समर्थक भय्या भोंगले यांना पक्षाने उपसरपंचपदासाठी उमेदवारी दिली. मात्र, जयसिंग घोसाळे आणि भय्या भोंगले यांच्यातील मतभेद यावेळी आडवे आले. भय्या भोंगले यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडल्यास ग्रामपंचायत कारभारात पटणार नाही, याची जाणीव जयसिंग घोसाळे यांना होती. त्यामुळे भय्या भोंगले यांची उपसरपंचपदी निवड होणे धोकादायक असल्याचे लक्षात आल्याने कपिल सुपल यांना अर्ज दाखल करण्याचे सांगण्यात आले. जयसिंग घोसाळे आणि भय्या भोंगले यांच्या वादाचा फटका उपसरपंच निवडणुकीत होणार हे गृहीत धरूनच पक्षाकडून पक्षादेश बजावण्यात आला आणि भय्या भोंगले यांनाच निवडून देण्याचे आदेश देण्यात आले.
प्रत्यक्षात निवडणुकीच्या वेळी भोंगले यांच्याऐवजी बंडखोर उमेदवार कपिल सुपल यांना निवडून देण्यात आले. त्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी शाखाप्रमुख संदीप सुर्वे यांच्यावर होती. त्यामुळे बंडखोरीचे ग्रहण लागताच पक्षाकडून शाखाप्रमुखावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता या पदावर आमदार समर्थक भोंगले यांची निवड करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या पदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकण्यात आली तरी बंडखोरी करणाऱ्या कपिल सुपल यांना पक्ष अभय देणार का? असा सवाल केला जात आहे. उपसरपंचपदाचा राजीनामा देण्याची सूचना करूनही त्यांनी राजीनामा देण्यास नकार देत प्रभागामध्ये आपल्या कामाला सुरूवात केली आहे. शिवेसेनेचे संपर्कप्रमुख विजय कदम यांनी शाखाप्रमुखावर कारवाई केली असली तरी बंडखोरी करणाऱ्या कपिल सुपल यांच्यावरील कारवाईबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पक्षाने त्यांना अभय दिले की, त्यांच्यावरही कारवाई होणार हे लवकरच पहायला मिळणार आहे. (प्रतिनिधी)


वाद संपणार नाही, वाढणार!
निवडणुकीतील उमेदवारीपासूनच पक्षात धुसफूस सुरू होती. जयसिंग घोसाळे यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्याचवेळी शिवसेनेतील काही नव्या उमेदीच्या शिलेदारांनी त्यांच्या नावाला विरोध कायम ठेवला होता. त्यामुळे अंतर्गत वाद धुमसत होता. भय्या भोंगले यांनाही कोणत्या प्रभागातून उमेदवारी द्यायची हा कळीचा मुद्दा होता. सरपंचपदी मंदा ठीक यांना उमेदवारी देऊन उपसरपंचपद आपल्या गळ्यात पाडायचे, अशी व्यूहरचना आखण्यात आली होती. त्यामुळे सरपंच, उपसरपंच निवडीबाबतही वाद निर्माण झाला होता.
शाखाप्रमुख संदीप सुर्वे यांना निलंबित करताना त्यांना यापुढे कोणतेही पद दिले जाणार नसल्याचे आमदारांनी जाहीर केले आहे. मात्र, सध्या ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्या पदाचा राजीनामा देण्यास सांगणार का? असा सवाल केला जात आहे. त्यातच आता शाखाप्रमुख म्हणून आमदार समर्थक भय्या भोंगले यांची वर्णी लावण्याची धडपड सुरू आहे. मात्र, या नावाला जुन्या शिवसैनिकांचा विरोध असल्याने हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातच हे पद देऊन त्यांची बोळवण केली जाणार आहे.


जुन्या-नव्या वादाचा फटका
शिवसेनेत पक्षशिस्त पाळण्याचे धडे दिले जातात. पक्षाने एकदा दिलेला आदेश म्हणजे आदेश असतो, हे मानून कार्यकर्ते काम करतात. ही बाब सत्य असली तरी नाचणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत पक्षादेश डावलून वैयक्तिक रागापोटी बंडखोर उमेदवाराला निवडून आणण्यात आले. त्यानंतर केवळ शाखाप्रमुखावर कारवाई केल्याचे दाखविले जात आहे. मात्र, बंडखोर उमेदवारावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

Web Title: Suspended and rebel branch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.