निलंबनाची कारवाई होणार

By admin | Published: October 26, 2015 11:24 PM2015-10-26T23:24:11+5:302015-10-27T00:13:38+5:30

तळवडेतील तांदूळ घोटाळा प्रकरण : संस्था पदाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर उपोषण मागे

Suspension action will take place | निलंबनाची कारवाई होणार

निलंबनाची कारवाई होणार

Next

तळवडे : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयातील शालेय पोषण आहारातील तांदुळ घोटाळ्याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई व्हावी, यासाठी सोमवारी तक्रारदार बाळा जाधव, नवसाजी परब यांनी विद्यालयासमोर आमरण उपोषण केले. संस्था पदाधिकाऱ्यांनी ३० आॅक्टोबरला मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजता उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान या घटनेला लागलेल्या राजकीय रंगामुळे विद्यालयाच्या परिसरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण राहिले.
तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री जनता विद्यालयात पोषण आहारामध्ये अफरातफर झाली असून पोषण आहारात घोटाळा झाल्याची तक्रार तळवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळा जाधव व नवसाजी परब यांनी केली होती. त्यानुसार संबंधित शाळेत जिल्हा परिषद शिक्षण सभापती, शैक्षणिक अधिकारी, पंचायत समिती अधिकारी यांनी भेट दिली होती.
यावेळी शाळेत रजिस्टर नोंदीनुसार अतिरिक्त पोषण आहार सापडला, असे अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार संबंधित शाळेचे मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माध्यमिक विभागाचे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांनी तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाला दिले होते.
पण प्रत्यक्षात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे तक्रारदार बाळा जाधव व नवसाजी परब यांनी तळवडे श्री जनता विद्यालयाकडे आमरण उपोषण सोमवारी सकाळपासून सुरू केले होते. त्यानुसार जनता विद्यालयाकडचा परिसर तंग बनला होता. तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विष्णू जयराम पेडणेकर व इतर संचालक यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर ३० आॅक्टोबरपर्यंत कारवाई करतो, असे तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यांनंतर हे आमरण उपोषण सोडण्यात आले.
त्यावेळी तळवडे सरपंच पंकज पेडणेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे बाळा पेडणेकर, भालचंद्र कांडरकर, जिल्हा परिषद सदस्या निकीता जाधव, उत्तम परब, जालींदर परब, बाळू साळगावकर, विजय रेडकर, रामचंद्र गावडे आदी उपस्थित होते. या उपोषणावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, प्रमोद गावडे, यांनी भेट दिली. निरवडे पोलीस पाटील अजित वैद्य, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस अधिकारी यांनी अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेतली होती. (प्रतिनिधी)


मुख्याध्यापक निर्दोष : प्रकाश परब
शाळेचे मुख्याध्यापक मालवणकर हे पोषण आहारात दोषी नसून त्यांनी कोणत्याही प्रकारची अफरातफर केली नाही. राजकीय प्राबल्याचा वापर करून निर्दोष प्रामाणिक शिक्षकास या प्रकरणात गुंतविण्याचे काम उपोषणकर्ते बाळा जाधव व सहकारी करीत आहेत, असे मत प्रकाश परब यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शासन निर्देशानुसार १०० व १५० ग्रॅम प्रत्येक मुलास पोषण आहार शासन नियमानुसार पटसंख्येनुसार मिळतो. पण सर्व मुले तेवढे पोषण आहार सेवन करत नाही. अतिरिक्त तांदुळ राहिल्यास त्याच प्रशालेतील मुलांना देण्यात येतो. राजकीय स्टंटबाजी करून त्यांना गोवण्यात येत आहे.
- प्रकाश परब, संस्था संचालक


गुरूनाथ पेडणेकर : संस्थेस कारवाईचा अधिकार
शालेय पोषण आहारात तळवडे श्री जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक दोषी आहेत काय? या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, शासनाच्या नियमानुसार संबंधित शाळेचे मुख्याध्यापक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई तळवडे शिक्षण प्रसारक मंडळ करू शकते.
त्यानुसार प्रशासन स्तरावर तळवडे शिक्षण प्रसारक मंडळास लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाईचे अधिकार शिक्षण संस्थेस आहेत, असे स्पष्ट केले .

Web Title: Suspension action will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.