निलंबनाचा आदेश बदलला

By admin | Published: February 22, 2016 12:15 AM2016-02-22T00:15:29+5:302016-02-22T00:15:29+5:30

अधिकाऱ्यांचे ‘लॉबिंग’ कार्यरत : वनक्षेत्रपाल पाटील यांच्या सक्तीच्या रजेत रुपांतर

Suspension order changed | निलंबनाचा आदेश बदलला

निलंबनाचा आदेश बदलला

Next

सावंतवाडी : कणकवली वनपरिक्षेत्रात मालकीक्षेत्रात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले कणकवली वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कुडाळ वनक्षेत्रपाल संजय कदम यांना कणकवली येथे प्रभारी म्हणून सोयीस्कररित्या जाता यावे, यासाठी हा आदेश बदलून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आदेश बदलण्यामागे एका निवृत्त अधिकाऱ्यासह सिंधुदुर्गपासून नागपूरपर्यंतची अधिकाऱ्यांची ‘लॉबिंग’ कार्यरत असल्याची चर्चा वनविभागातच सुरू आहे.
तीन वर्षांपूर्वी घडलेल्या कणकवली वनपरिक्षेत्रातील वैभववाडी येथील लोरे नं.२, वाभवे, मांगवली व घोणसरी या चार गावात वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील यांनी मागील तारखा दाखवून १५ खोटी मालकीप्रकरणे केली होती.
या प्रकरणाचा ठपका ठेवून कृष्णा सावंत (वनपाल वैभववाडी) व दत्तगुरू पिळणकर (वनरक्षक घोणसरी) या दोघा वनकर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तर वनक्षेत्रपाल पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव नागपूर वनपरिक्षेत्राकडे पाठवून देण्यात आला होता. आतापर्यंत आर. एस. पाटील यांची कारकीर्द वादग्रस्तच ठरल्याने त्यांना सेवेतूनच बडतर्फ केले जावे, अशा प्रकारची चर्चा नागपूर येथील अधिकाऱ्यांमध्ये झाली होती.
ही चर्चा सुरू असतानाच तात्पुरती त्यांची कणकवली येथून सामाजिक वनीकरण विभागात बदली करण्यात येणार होती. तसे आदेश नागपूर येथील कार्यालयाने निर्गमित केले होते. हे आदेश नागपूरहून कोल्हापूर येथे येण्यापूर्वीच काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या साखळीने जर कणकवली वनक्षेत्रपाल निलंबित किंवा त्याची अन्यत्र बदली केली, तर त्याच्या जागी नवीन अधिकारी कोणतरी येईल आणि आम्ही ज्याच्यासाठी हे सर्व काही केले, ते फुकट जाईल म्हणून सिंधुदुर्गमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाटील यांचे निलंबन किंवा बदली करण्यापेक्षा सक्तीच्या रजेवर पाठवण्याबाबत एकमत झाले आणि तसा आदेशही काढण्यात आला
हा आदेश बदलण्यामागे कुडाळ वनक्षेत्रपाल कदम यांनी वनविभागात मोठे लॉबिंग केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मुळचे देवगड-शिरगाव येथील असलेले कदम हे कुडाळ वनक्षेत्रपाल म्हणून गेली तीन वर्षे कार्यरत आहेत. त्यांची यावर्षी बदली होणार असून, जिल्ह्यातून बाहेर जाण्यापेक्षा याच जिल्ह्यात उर्वरित सेवा पूर्ण करण्याच्या हेतूने त्यांनी ही लॉबिंग केल्याची चर्चा आहे. यात काही अधिकाऱ्यांचा व राजकीय पुढाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनीही कदम यांच्यासाठी आपले वजन वरिष्ठ पातळीवर वापरले आहे.
हा आदेश दोन दिवसंपूर्वीच नागपूर येथून कोल्हापूर येथे आला होता. तर गुरूवारी १८ फेबु्रवारीला हा आदेश सिंधुदुर्ग वनविभागाला पाठवण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी १९ फेबु्रवारी शिवजयंती असल्याने शनिवारी करण्यात आली.
मात्र, हा आदेश देत असतानाच कोल्हापूर येथील मुख्यवनसंरक्षक एम. के. राव यांनी कणकवली येथील वनक्षेत्रपाल पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर त्यांच्या जागी कडावल येथील वनक्षेपाल रमेश कांबळे यांना पाठवा, असे आदेश दिले होते. मात्र, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी मुख्यवनसंरक्षक राव यांना दूरध्वनीवरून चर्चा केली की, कडावल वनक्षेत्रपाल कांबळे हे कणकवली विभाग सांभाळण्यास राजी नाहीत.
त्यामुळे हा कार्यभार कुडाळ यांच्याकडे दिला जावा, असे सांगितले. त्यामुळे लागलीच हा आदेश बदलण्यात आला. त्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणीही करण्यात आली.
 

Web Title: Suspension order changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.