मारहाणप्रकरणी उपोषण स्थगित
By admin | Published: January 10, 2017 10:55 PM2017-01-10T22:55:38+5:302017-01-10T22:55:38+5:30
सागर वाघ यांनी साधला वायरी ग्रामस्थांशी संवाद : पोलिस उपनिरीक्षक निलंबनाची मागणी ग्रामस्थांच्या अंगलट
मालवण : पर्यटन व्यावसायिक सतीश आचरेकर याने महाविद्यालयीन युवक मोहित मिलिंद झाड याच्यावर केलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी वायरी ग्रामस्थांनी छेडलेले उपोषण जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशामुळे स्थगित केले. यावेळी उपोषणात असलेले पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांचे निलंबन करण्याची मागणी ग्रामस्थांच्या अंगलट आली. डॉ. वाघ यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्याप्रती असलेला गैरसमज दूर केला. त्यामुळे गेले दहा दिवस वाघ यांचे निलंबन करण्याची मागणी करणारे काही ग्रामस्थ तोंडघशी पडले.
उपोषण स्थगित करण्यात यावे, अशा आशयाच्या नोटिसा सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्याने वायरी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला नोटिसा बजावण्यापेक्षा हल्लेखोर आचरेकर याला यापूर्वीच बजावण्यात यायला हव्या होतात, असे सांगत वर्षभर विविध कारणामुळे मनाई आदेश लागू करण्यात येत असेल तरी जनतेने न्याय केव्हा मागावा, असाही संतप्त सवाल केला. वायरी ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता मालवण तहसीलदार यांना सतीश आचरेकर याच्या शिक्षेचा निकाल लागेपर्यंत त्याचा पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्यात यावा अशा आशयाचे तर पोलिस निरीक्षकांना आचरेकर याच्यावर तातडीने हद्दपारीची कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून केली. यावेळी पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वायरी सरपंच सुजाता मातोंडकर, उपसरपंच ललीतकुमार वराडकर, भगवान लुडबे, डॉ. जितेंद्र केरकर, श्याम झाड, मिलिंद झाड, प्रसाद चव्हाण, प्रदीप मांजरेकर, प्रसाद आडवणकर, गोट्या मसुरकर, छोटू सावजी, साक्षी लुडबे, वर्षा वेंगुर्लेकर, बाबल गोसावी, केदार झाड, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, बबलू राऊत, जगदीश सातार्डेकर, अविनाश सामंत आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
ग्रामस्थ पडले तोंडघशी
मोहित झाड मारहाण प्रकरणानंतर वायरी ग्रामस्थांनी पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनासाठी दोन गाव बैठका व रास्तारोको आंदोलन छेडले होते. मंगळवारी वाघ यांच्या निलंबनाची मागणी करत छेडण्यात आलेले उपोषण स्थगित झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षकांसमवेत झालेल्या बैठकीत डॉ. वाघ यांनी घटनाक्रमाचे स्पष्टीकरण देताना आपण फिर्याद देण्यास आलेल्या व्यक्तीच्या कॉलरला पकडले नसून पोलिस ठाण्यात येणाऱ्यांच्या गळ्यात हात टाकून तपास करणे ही आपली शैली असल्याचे सांगितले. राजन चव्हाण यांची आपण फिर्याद घेणार नाही, असे म्हटले नाही असे सांगितल्यावर चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी चुकीचे केलेले आरोप मान्य करत वाघ यांच्या स्पष्टीकरणानंतर ग्रामस्थ तोंडघशी पडले.
हद्दपारीची कारवाई करणार : बोडके
मालवणात मासेमारीनंतर पर्यटन व्यवसाय वाढत आहे. मात्र पर्यटकांना वेळोवेळी मारहाण करणाऱ्या सतीश आचरेकरची दहशत वाढत आहे. त्यामुळे सतीश आचरेकरसारख्या विघातक प्रवृत्ती मालवणातून उधळून लावण्यासाठी त्याला हद्दपार करण्याची आक्रमक मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यावेळी पोलिस निरीक्षक बोडके यांनी आचरेकर याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्याच्यावर असलेल्या गुन्ह्याच्या आधारे हद्दपारीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले