आंबोलीत सापडलेली संशयास्पद दुचाकी पानसरे हल्ल्यातील ?

By admin | Published: March 22, 2015 12:26 AM2015-03-22T00:26:27+5:302015-03-22T00:26:27+5:30

तपास सध्या सिंधुदुर्ग व कोल्हापूर पोलीस करीत आहेत

Suspicious bike in Ambalat attacked by Panesar? | आंबोलीत सापडलेली संशयास्पद दुचाकी पानसरे हल्ल्यातील ?

आंबोलीत सापडलेली संशयास्पद दुचाकी पानसरे हल्ल्यातील ?

Next


सावंतवाडी़/कोल्हापूर : आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचा वापर हा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला होता का, याचा तपास सध्या सिंधुदुर्ग व कोल्हापूर पोलीस करीत आहेत. या मोटारसायकलीची माहिती घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंबोली येथे येऊन घटनास्थळांची व दुचाकीची पाहणी करून परतले. याबाबतचा अहवाल ते पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देणार आहेत. त्यानंतरच या तपासाची सूत्रे हलणार आहेत. या मोटारसायकलीचा नंबर के ए २८ व्ही- ५०३१ असा आहे.
ही मोटारसायकल कर्नाटकातील राजशेखर नामक व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती आॅगस्ट २०१४ मध्ये चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी बेळगावातील पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, कोल्हापूरची हद्द संपल्यानंतर अवघ्या चार किलोमीटरवर ९ असलेल्या गडदूवाडी आंबोली येथे मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावर मोटारसायकल बेवारस स्थितीत वनमजुरांना आढळून आली. या वनमजुराने आंबोली पोलिसांना या घटनेची कल्पना दिल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळावरून ती ताब्यात घेतली. यावेळी या मोटारसायकलीस पुढे व मागे नंबरप्लेट नव्हती. पुढचा भागही फुटलेल्या अवस्थेत होता. मोटारसायकलीतील पेट्रोलही संपले होते.
आंबोली पोलिसांनी या गाडीचा पंचनामा केला तसेच याची खबर सर्वत्र दिली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी कोल्हापूर पोलिसांचे पथक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोलीत दाखल झाले. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांनीही काळ््या रंगाची दुचाकी वापरली होती. आंबोलीत सापडलेली दुचाकी व मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी यात साम्य वाटत असल्याने पोलिसांनी दुचाकीसह जागेची पाहणी केली. ही गाडी नेमकी कुठली याचा शोधही त्यांनी घेतला. कर्नाटकमधील राजशेखर शेखदारस यांच्या मालकीची ती असल्याचे निष्पण्ण झाले. ही मोटारसायकल २७ आॅगस्ट २०१४ ला चोरीला गेल्याची तक्रार टिळकवाडी बेळगाव या पोलीस ठाण्यात दिली असल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले आहे. या दुचाकीच्या तपासाबाबतचा अहवाल कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देणार असून, त्यानंतर पुढील तपासाची सूत्रे हलविण्यात येणार आहेत.
पुढील भाग तुटलेल्या अवस्थेत
गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी जी दुचाकी वापरली होती, ती काळ्या रंगाची होती तसेच या दुचाकीला कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेत्याच्या सायकलची धडक लागली होती. यावेळी सायकलस्वार व मारेकऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली होती. त्यामुळे सायकलच्या धडकेनंतर दुचाकीचा पुढील भाग मोडू शकतो का, याचाही अभ्यास सुरू असून, सद्य:स्थितीत काहीअंशी या मोटारसायकलीचे पुरावे मिळते जुळते आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suspicious bike in Ambalat attacked by Panesar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.