संशयास्पद बोट आढळली

By admin | Published: August 7, 2016 10:46 PM2016-08-07T22:46:51+5:302016-08-07T22:46:51+5:30

तांबळडेग नागरिकांनी नि:श्वास सोडला : तपासानंतर लाईफ बोट असल्याचे स्पष्ट

Suspicious finger found | संशयास्पद बोट आढळली

संशयास्पद बोट आढळली

Next

देवगड : तांबळडेग समुद्रकिनारी अष्टकोनी लाईफ राफ्ट ही (रबरी) संशयास्पद बोट आढळून आल्याने त्याची सागरी सुरक्षा व पोलिस यंत्रणेने तपासणी केली असता ही बोट मोठ्या जहाजांसोबत असणारी लाईफ बोट असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणेबरोबरच तेथील नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
ही बोट रविवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास आढळून आली आहे. अशाच स्वरूपाची बोट ३० एप्रिल २०१५ रोजी विजयदुर्ग बंदरामध्ये आढळून आली होती.
तांबळडेग येथील मच्छिमार संजय कोयंडे हे रविवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या मच्छिमारीचे जाळे घेऊन मच्छिमारी करण्यासाठी तांबळडेग समुद्रकिनारी गेले होते. यावेळी त्यांना तांबळडेग मोर्वे संगमावर एक रबरी बोट तरंगताना दिसली. या बोटीबाबत संशय आल्याने त्यांनी ती बोट खाडीकिनारी आणून तांबळडेगचे सरपंच नीलेश सादये यांना कल्पना दिली.
त्यानंतर सरपंच सादये यांनी तत्काळ देवगड पोलिस स्टेशनशी संपर्क साधून संशयास्पद बोट मच्छिमाराला मिळाल्याबद्दलची माहिती दिली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी त्याची दखल घेऊन तांबळडेग येथे धाव घेतली. यानंतर या बोटीची पाहणी केली. यावेळी सरपंच नीलेश सादये, उपसरपंच रमाकांत सनये, पोलिस पाटील जयवंत मिठबांवकर, ग्रामस्थ संजय कोयंडे, सागर मालंडकर, संतोष कोयंडे, सागर सुरक्षारक्षक अभिषेक कोयंडे, बंड्या गावकर, जगदीश मालडकर, विष्णू धावडे उपस्थित होते. बोटीची तपासणी करत असताना संशयास्पद बोटीमध्ये दोन बॅगा सापडल्या. या बोटीमध्ये असलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये ‘इनफिनीटी शिप’ची लाइफबोट असून पनामा पोर्टमधील रजिस्ट्रेशन असल्याची व शांघाय येथे बोट बनविल्याची माहिती मिळाली. ३० एप्रिल २०१५ रोजी विजयदुर्ग समुद्रकिनारी अशी बोट सागरी सुरक्षा दलाच्या सदस्याला आढळून आली होती. त्यावेळीही पोलिसांनी या बोटीचा पंचनामा करून त्या बोटीचा शोध घेताना विजयदुर्ग बंदर येथे गोवा येथील साळगांवकर कंपनीचे जहाज कित्येक महिने दुरुस्तीसाठी त्याठिकाणी होते. त्याच जहाजावरील लाईफ राफ्ट पडल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. ही बोटही अशाच कुठल्यातरी मोठ्या जहाजावरील असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बोटीबाबत कस्टम विभागाकडून माहिती उपलब्ध करून घेतली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले.
पोलिसांकडून पाहणी
या बोटीमध्ये पाण्याचे पाऊच, बिस्कीट पाकिटे, सिग्नल नळी याशिवाय संशयास्पद काहीही आढळले नाही.
दोन्ही बॅगांमध्ये ५८ पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या, १९ बिस्कीटचे बॉक्स व प्रथमोपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बॉक्स आढळून आला.
संशयास्पद बोटीची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी दुपारी तांबळडेग येथे घटनास्थळी भेट देऊन बोटीची पाहणी केली.
यावेळी पोलिस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, सागर सुरक्षा दलाचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.


भुईबावडा घाट सुरळीत
वैभववाडी : भुईबाबडा घाटात शनिवारी मध्यरात्री दरड कोसळल्याने दिवसभर वाहतूक ठप्प होती. दरड हटवून तब्बल १८ तासांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सायंकाळी साडेसात वाजता वाहतूक सुरळीत केली. भुईबावडा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याची आठवड्यातील ही चौथी घटना आहे. दरम्यान, पुरामुळे शुक्रवारी बंद झालेला गगनबावडा- कोल्हापूर मार्ग तिसऱ्या दिवशी रविवारी दुपारी सुरू झाला आहे.
गगनबावड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर भुईबावडा घाटात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दरड कोसळली. दरडीतील मोठ्या दगडांमुळे मध्यरात्रीपासूनच रस्ता बंद झाला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मुकुंद कचरे यांच्या उपस्थितीत दरड हटविण्याची मोहीम सकाळीच सुरू करण्यात आली..
रविवारी दिवसभर दरड हटाव मोहीम राबविल्यानंतर तब्बल १८ तासांनी सायंकाळी ७.३० च्या सुमारास भुईबावडा घाटमार्गाची वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. या मार्गावरील धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारीपासून ठप्प झालेला गगनबावडा-कोल्हापूर राज्यमार्ग सुरू झाला आहे.

Web Title: Suspicious finger found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.