स्कुबा डायव्हिंग सेंटरचे ग्रहण सुटेना

By admin | Published: September 17, 2015 10:02 PM2015-09-17T22:02:31+5:302015-09-18T23:39:11+5:30

तारकर्ली, देवबाग गावांमधील वाद : जिल्हाधिकाऱ्यांची सभा निर्णयाविना

Sutena eclipsed Scuba Diving Center | स्कुबा डायव्हिंग सेंटरचे ग्रहण सुटेना

स्कुबा डायव्हिंग सेंटरचे ग्रहण सुटेना

Next

मालवण : तारकर्ली-देवबाग अशा नामफलक वादात अडकून पडलेल्या स्कुबा डायव्हिंग सेंटरबद्दल निर्माण झालेला दोन गावांचा वाद निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी मंगळवारी आयोजित केलेली खास सभा निर्णयाविना आटोपती घेण्यात आली. यामुळे स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्पाचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात ही सभा घेण्यात आली होती. यावेळी तहसीलदार वनिता पाटील, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, दोन्ही गावांचे सरपंच, पोलीसपाटील तसेच इतर पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी देवबाग आणि तारकर्ली गावातील दोन्हींकडून नामफलक वादावर आपली भूमिका कायम ठेवण्यात आली होती. तारकर्लीकडून देवबागचे नाव नामफलकावर येऊ नये, तर देवबागकडून तारकर्ली-देवबाग किंवा देवबाग-तारकर्ली, असे कोणतेही नाव आम्हाला चालेल अशी भूमिका घेतली होती. तर एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी देतील तो निर्णय मान्य, अशी भूमिका मांडण्यात आली. मात्र, कोणताही निर्णय सभेत झाला नाही. (प्रतिनिधी)


फलक नामकरणावरून वाद
स्कुबा डायव्हिंग सेंटर दोन्ही गावांच्या सीमेवरच आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रवेशद्वारानजीकच्या फलकावर स्कुबा डायव्हिंग सेंटर देवबाग- तारकर्ली, असे नामकरण करण्यात आले. देवबागचे नाव लावण्यास तारकर्लीच्या ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. नंतर पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देवबागचे नाव काढून टाकले. त्यामुळे देवबागमधील पर्यटन व्यावसायिक आक्रमक झाले. पर्यटन महामंडळाकडून देवबाग गावाचे नाव रितसर दिले गेले असेल, तर स्थानिक अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून ते हटवू नये. आम्ही ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. देवबाग ग्रामस्थांनी तारकर्ली, असा उल्लेख असलेली नावाची पट्टी काढून टाकली होती. यानंतर या वादावर तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात यश न आल्याने आजपर्यंत हा प्रकल्प रखडला आहे.

वादात प्रकल्पाची वाताहात ?
या सेंटरमध्ये देश-विदेशातील युवकांना स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. प्रकल्प आॅक्टोबर २०१४ मध्ये पूर्ण होऊनही अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या सेंटरमध्ये आवश्यक कर्मचारी वर्गही भरलेला आहे. उद्घाटनच होत नसल्याने यात कोणत्याही प्रशिक्षणास अद्याप सुरुवात झालेले नाही. त्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले स्कुबा डायव्हिंग सेंटर शोभेची वस्तू बनले आहे. हे केंद्र सुरू झाल्यास देश-विदेशातून मोठ्या संख्येने युवक प्रशिक्षणासाठी देवबाग-तारकर्लीत आले असते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनाच याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

करमणूक कर होणार लागू
दरम्यान, जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दुपारी स्कुबा डायव्हिंग, स्नॉकलिंग तसेच इतर पर्यटन व्यवसायातील व्यावसायिकांना करमणूक कर भरावाच लागणार, असे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने मेरीटाईम बोर्डाकडून आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून परवाने घेण्याची सूचना करण्यात आली.

Web Title: Sutena eclipsed Scuba Diving Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.