शिरवलच्या वृद्धाची रेल्वेखाली आत्महत्या
By admin | Published: November 15, 2015 12:39 AM2015-11-15T00:39:31+5:302015-11-15T00:39:31+5:30
पत्नीच्या देखत घेतली उडी
कणकवली : आजारपणाला कंटाळून शिरवल येथील वृद्धाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. सोबत आत्महत्या करण्यास आलेली पत्नी मात्र किरकोळ दुखापत होऊन वाचली. शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महादेव सखाराम धुरी (वय ५८, रा. शिरवल, कोळभाटवाडी) असे वृद्धाचे नाव आहे.
ट्रेनने वृद्धाला उडवल्यानंतर रो-रोच्या मोटारमनने कणकवली रेल्वेस्थानकात कळविले. त्यानंतर रेल्वे पोलीस अब्दुल सत्तार आणि स्थानिक पोलीस बाळू कांबळे, एम. बी. बावधने आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच आसपासचे नागरिकही गोळा झाले. त्यावेळी महादेव धुरी यांची पत्नीही घटनास्थळी उपस्थित होती.
शिरवल, कोळभाटवाडी येथील महादेव धुरी हे शेतकरी पत्नी, मुलगा, सून नातवंडांसह राहत होते. महादेव धुरी आजारपणाने त्रस्त झाले होते. शनिवारी महादेव धुरी पत्नी शुभांगी (वय ५०) यांच्यासह मुंबईला जाण्यासाठी म्हणून कणकवली रेल्वेस्थानकावर आले.
आजाराने त्रस्त महादेव धुरी यांनी तेथेच आपला विचार बदलला आणि ट्रॅकवरून पत्नीसह ते मुंबईच्या दिशेने चालू लागले. बांधकरवाडी, दत्तमंदिरपर्यंत गेले. ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या रो-रो गाडीखाली महादेव धुरी यांनी झोकून दिले. मात्र, शुभांगी धुरी वाचल्या. महादेव धुरी जागीच ठार झाले. छिन्नविच्छिन्न मृतदेहाशेजारीच शुभांगी या बसून होत्या. त्यांना घरी पाठविण्यात आले, तर शवविच्छेदन करून महादेव धुरी यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (प्रतिनिधी)