शोभना कांबळे यांना स्वावलंबन पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2016 11:51 PM2016-01-18T23:51:33+5:302016-01-19T00:06:53+5:30
महाराष्ट्र शासन : ‘महालक्ष्मी सरस’च्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्यातील बचत गटांचाही सन्मान
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाचा राजमाता स्वावलंबन पुरस्कार लोकमतच्या पत्रकार शोभना कांबळे यांना रविवारी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस - २०१६ च्या उद्घाटन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे मुंबई (वांद्रे) येथील म्हाडा मैदानावर राज्यातील महिला उद्योजक आणि ग्रामीण कारागिरांनी बनवलेल्या वस्तू व कलाकृतींची विक्री व प्रदर्शन ‘महालक्ष्मी सरस - २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर लोकसभा सदस्या पूनम महाजन, अॅड. आशिष शेलार, राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मुख्य सचिव व्ही. गिरीराज, ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी तसेच नाबार्डचे प्रतिनिधी पद्मनाभन उपस्थित होते.
प्रारंभी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राज्यातील पुरस्कारप्राप्त बचत गटांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर जिल्हा व विभागीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त बचत गटांना तसेच सर्वोत्कृष्ट पत्रकार आणि बँकांना गौरविण्यात आले. लोकमतच्या पत्रकार शोभना कांबळे यांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्रधान सचिव वि. गिरीराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी एकनाथ साळवी, अंजली साळवी उपस्थित होते. जिल्ह्यातील महिला बचत गट चळवळ वृद्धींगत व्हावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
जिल्हास्तरावर निवडण्यात आलेल्या पहिल्या तीन बचत गटांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीसमर्थ स्वयंसमूह महिला बचत गट, चिपळूण, जाकादेवी स्वयंसहायता महिला बचत गट, विसापूर, ता. गुहागर, नवलाईदेवी स्वयंसहायता महिला बचत गट, मेर्वी कुर्धे (ता. रत्नागिरी) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. या प्रदर्शनात विविध जिल्ह्यातील ४५०हून अधिक बचत गटांनी सहभाग घेतला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील २१ बचत गटांनी या प्रदर्शनात आपल्या विविध वस्तू विक्रीकरिता ठेवल्या आहेत. हे प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी विक्री झाल्याचे बचत गटांच्या सदस्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)