राणेंच्या स्वाभिमान पक्षाला धक्का, सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य भाजपात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 03:52 PM2017-11-24T15:52:34+5:302017-11-24T15:57:06+5:30
राणे समर्थकांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ग्रामपंचायत म्हणून दावा केलेल्या गेळे ग्रामपंचायत सरपंचांसह सदस्यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला
सावंतवाडी : राणे समर्थकांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ग्रामपंचायत म्हणून दावा केलेल्या गेळे ग्रामपंचायत सरपंचांसह सदस्यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला. कबुलायत गावकार प्रश्न सोडविण्याबरोबर गावचा विकास व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरपंच अंकु श कदम यांनी सागितले.
ग्रामपंचायत निकालानंतर ही ग्रामपंचायत आपली आहे, असा दावा करणा-या स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष यांना हा धक्का मानला जात आहे. तर आतापर्यंत तालुक्यातील १७ ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत, असा दावा भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी केला आहे. भविष्यात हा आकडा वाढणार आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, तालुकाध्यक्ष महेश सारंग, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, श्यामकांत काणेकर, चंद्रकांत जाधव, दादू कविटकर, राजू गावडे उपस्थित होते.
यावेळी सरपंच कदम म्हणाले, गेली कित्येक वर्षे आमचा जमिनीचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत आम्ही काँग्रेस, शिवसेनेच्या माध्यमातून शासन दरबारी आवाज उठविला, मात्र हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याबाबत तेली यांनी आम्हांला दिलेल्या शब्दावर विश्वास ठेऊन आम्ही हा प्रवेश करीत आहोत. ते हा प्रश्न चांगल्याप्रकारे हाताळणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. यावेळी सदस्य श्रीधर गवस, प्रकाश लाड, सुप्रिया बंड, वैष्णवी दळवी, प्रविणा कदम आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीवर स्वाभिमानचा दावा होता. मुळात या ठिकाणी प्रवेश केलेले सरपंच व सदस्य हे मूळ काँग्रेसचे असून ते काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत आहेत. त्यांनी गावचा विकास व जमिनीचा विकास घेऊन केलेल्या प्रवेशाचे निश्चितच फलित होईल, असे राजू गावडे म्हणाले.
२७४ कुटुंबांना न्याय देणार : राजन तेली
राजन तेली म्हणाले, राज्यात व केंद्रात ज्या पध्दतीने काम सुरू झाले आहे, त्याच्यावर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश करण्याची संख्या वाढत आहे. गेळे सरपंच व त्यांच्यासोबत असलेल्या सर्व सदस्यांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. त्याठिकाणी असलेल्या २७४ कुटुंबांना न्याय देण्याचे काम करणार असून आम्ही पूर्णपणे गावाच्या पाठिशी राहणार आहोत. लवकरच जमिनी प्रश्नी महसूलमंंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय घालून जितक्या लवकर हा प्रश्न सोडविता येईल तितका प्रयत्न राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.