मालवणात स्वच्छ भारत मिशनचे वाजले तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:24 PM2021-02-13T12:24:02+5:302021-02-13T12:27:41+5:30
Malvan Sindhudurgnews- मालवण शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. घरोघरी कचरा उचलणाऱ्या ढकलगाड्यांसह कचरा वाहतूक करणारी वाहनेही नादुरुस्त बनल्याने शहरात कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसून येत आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
मालवण : मालवण शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. घरोघरी कचरा उचलणाऱ्या ढकलगाड्यांसह कचरा वाहतूक करणारी वाहनेही नादुरुस्त बनल्याने शहरात कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसून येत आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, कचरा समस्येची गंभीर दखल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली आहे. नादुरुस्त सर्व गाड्या तत्काळ दुरुस्त करून घ्या. शहरात सर्वत्र पाहणी करून ज्या ठिकाणी कचरा साचला आहे त्याची उचल स्वच्छता विभागाकडून तत्काळ करून घ्या, असे आदेश नगराध्यक्ष यांनी प्रशासनास दिले आहेत.
मालवण शहरातील प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे १७ प्रभागांत ढकलगाड्या दर दिवशी फिरवून घरोघरी कचऱ्याची उचल केली जात होती. मात्र, १३ गाड्या बंद पडल्याने अनेक प्रभागात गेले काही दिवस कचरा उचलण्यासाठी गाडीच येत नसल्याची तक्रार आहे. याबाबत नागरिकांच्याही तक्रारी वाढत आहेत.
घरोघरी उचल केलेला अथवा सार्वजनिक ठिकाणी असलेला कचरा वाहतूक करून डम्पिंग ग्राऊंड येथे नेण्यासाठी पालिकेने तीन वर्षांपूर्वी पाच नव्या गाड्या (छोटे टेम्पो) खरेदी केल्या. मात्र, या गाड्या गंजून, तुटून गेल्या आहेत. टायर फुटले आहेत. तीन गाड्या पालिका आवारात बंद स्थितीत आहेत. पालिका प्रशासनाच्या कारभारावर शिवसेना पदाधिकारी व सत्ताधारी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवासेना शहरप्रमुख तथा नगरसेविका तृप्ती मयेकर यांचे पुत्र तपस्वी मयेकर यांनी सकाळी कचरा वाहतूक वाहने अडवली.
मृत माकड दिवसभर रस्त्यावर
वायरी-हिंदळेकर वाडा येथे एक माकड मृतावस्थेत रस्त्यावर पडले होते. याबाबत पालिका आरोग्य विभागाला सकाळी सूचना देऊनही सायंकाळपर्यंत त्या माकडाला उचलण्याची कार्यवाही झाली नाही. स्वच्छता-आरोग्य विभागाच्या अशा भोंगळ कारभारामुळे शहरात आरोग्य प्रश्न निर्माण होण्याची भीती तपस्वी मयेकर यांनी व्यक्त केली आहे.