दारिस्ते येथील स्वप्नाली सुतार हिने मिळविली पशुवैद्यकीय पदवी, या क्षेत्रात मुलींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 17, 2023 04:34 PM2023-11-17T16:34:29+5:302023-11-17T16:34:43+5:30
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वप्नाली सुतार हिने आपल्या जिद्ध आणि प्रयत्नांच्या जोरावर पशुवैद्यकीय पदवी ...
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वप्नाली सुतार हिने आपल्या जिद्ध आणि प्रयत्नांच्या जोरावर पशुवैद्यकीय पदवी विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये पास होत मिळवली आहे. मुक्या प्राण्यांचे जीवन सुकर होण्यासाठी तण-मन-धन अर्पण करून सेवा देण्याचा तिचा मानस आहे.
स्वप्नालीचे प्राथमिक शिक्षण दारिस्ते सारख्या खेडेगावात तर माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूल व उच्च माध्यमिक कणकवली कॉलेज येथे झाले आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर तिने दहावीला ९७ टक्के तर बारावीला ८६ टक्के मिळवत बोर्डाच्या आलेखावर आपले नाव कोरले. लहानपणापासूनच प्राण्यांची आवड असलेल्या स्वप्नालीला त्यांच्या मुक्यापणामुळे होणारी होरपळ, त्यांच्या वेदना, त्यांना होणारे आजार अस्वस्थ करत होते. मुक्या प्राण्यांचे आजार व त्यांना होणाऱ्या वेदना पाहूनच मला या क्षेत्रात येण्याची आसक्ती लागल्याचे स्वप्नाली सांगते.
या क्षेत्रात मुलींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. तरी पण स्वप्नालीने हे क्षेत्र मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने निवडले. तिचे आई-वडील शेतकरी असून मुलीने निवडलेल्या या जोखमीच्या क्षेत्राबद्दल त्यांना सार्थ अभिमान आहे. कोरोना काळात तर तिला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले होते; परंतु तिने त्यावर मात करत आपले लक्ष पूर्ण केले.
सेमिनारच्या निमित्ताने अनेक भागात जाण्याची संधी
मुंबई पशुवैद्यकीय कॉलेज गोरेगाव येथे तिने आपले पशुवैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यामध्ये ८३.६२ टक्के गुण मिळवत तिने आपले स्वप्न जिद्दीने पूर्ण केले. साडेपाच वर्षांचा हा डिग्री कोर्स पूर्ण करताना तिला गोवा, तामिळनाडू, उत्तराखंड, गुजरात, अहमदाबाद, सिलवासा याठिकाणी सेमिनारच्या निमित्ताने जायची संधीही मिळाली. दारिस्ते सारख्या खेडेगावातून पुढे जाऊन स्वप्नालीने मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास पात्र आहे. तिच्या या यशाबद्दल कनेडी दशक्रोशीतून तिचे अभिनंदन होत आहे.