नाधवडेतील देवलकर दाम्पत्याच्या घराची 'स्वप्नपूर्ती', 56 दिवसांत 'निर्धार' गेला 'पूर्णत्वास'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 10:28 PM2019-01-03T22:28:16+5:302019-01-03T22:28:23+5:30
प्लास्टिकने झाकलेल्या नळ्याच्या झोपड्यातून हक्काच्या पक्क्या जाण्याचे नाधवडेतील वृद्ध देवलकर दाम्पत्याने आयुष्यभर पाहिलेले स्वप्न अखेर नववर्षाच्या प्रारंभी पूर्णत्वास गेले आहे.
वैभववाडी: प्लास्टिकने झाकलेल्या नळ्याच्या झोपड्यातून हक्काच्या पक्क्या जाण्याचे नाधवडेतील वृद्ध देवलकर दाम्पत्याने आयुष्यभर पाहिलेले स्वप्न अखेर नववर्षाच्या प्रारंभी पूर्णत्वास गेले आहे. वैभववाडीतील दत्तकृपा प्रतिष्ठानने पुढाकार घेत दिवाळी दिवशी दोन महिन्यात या दाम्पत्यासाठी घर उभारण्याचा केलेला निर्धार यानिमित्ताने पूर्णत्वास गेला आहे. गुरुवारी देवलकर दाम्पत्याचा 'स्वप्नपूर्ती' वास्तूत थाटात गृहप्रवेश झाला. यावेळी अनेकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
नाधवडे ब्राह्मणदेववाडी येथील रामचंद्र भिकाजी देवलकर व पत्नी सीताबाई सत्तरीत पोहोचलेले दाम्पत्य! त्यातही रामचंद्र हे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त. पालन-पोषण करणारे तसे जवळचे कोणी नाही. आणि रहायला नीट घरही नाही. या दाम्पत्याची ही अवस्था दत्तकृपा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या कानावर गेली. त्यामुळे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते 8 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त देवलकर दाम्पत्याकडे गेले. त्यांच्या झोपडीवजा घरात जीव मुठीत घेऊनच वाकून प्रवेश करताना प्रत्येकाच्या मनात प्रश्नांचे काहूर माजलेले. आपण कोण म्हणून सांगावे? काय सांगावे आणि का आलो हे कसे सांगावे. काहीच सुचत नव्हते.
नाधवडेचे सुपुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे ओळख करून दिल्यावर रामचंद्र देवलकरांना 'हुंदका' आवरला नाही. चहुबाजूंनी लाकडाचे ठेंगारे देऊन प्लास्टिकने अच्छादलेले कधीही कोसळण्याच्या शक्यतेत असलेल्या त्यांच्या घराच्या छप्पराकडे पाहिल्यावर सारेच सुन्न झाले. त्याचक्षणी देवलकर दांम्पत्याचे पक्क्या घराचे स्वप्न पुर्ण त्यांच्या डोक्यावरील 'संकट' दूर करण्याचा निर्धार प्रतिष्ठानने केला. 15 नोव्हेंबरला दत्तकृपा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन देेेेवलकरांंच्या पक्क्या घराच्या कामाचा शुभांरभ केला.
स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून देवलकर दांम्पत्याचे पक्के घर चाळीस दिवसांत उभे राहिले. त्यामुळे गृहप्रवेशाची लगबग सुरु झाली. गेल्या दोन तीन दिवसांपासून प्रत्येकजण आपल्याच घरचा कार्यक्रम समजून नियोजनात गुंतून गेल्याचे चित्र नजरेस पडत होते. सगळीकडे आंनदाचे वातावरण होते. देवलकर दाम्पत्य अक्षरक्षः भारावून गेले होते. गणेश पुजन झाले. महाप्रसाद झाला. सीताबाई देवलकर यांची धावपळ सुरु होती. तर बसल्याजागी रामचंद्र देवलकर यांचे डोळे मात्र आनंदाश्रूंनी सतत गडबडल्याचे दिसत होते.
देवलकर दाम्पत्याच्या हक्काच्या पक्क्या घराची स्वप्नपूर्ती झाली. त्यानिमीत्ताने सभातपी लक्ष्मण रावराणे, भैरी भवानी पतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती दिगबंर मांजरेकर, नगरसेवक संतोष माईणकर, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राकेश कुडतरकर, बाबा कोकाटे, कवी मधुसुदन नानीवडेकर, संजय खानविलकर, शासकीय अधिकारी व कर्मचा-यांसह अनेकांनी देवलकर दांम्पत्याची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
'स्वप्नपुर्ती'साठी अनेकांचे योगदान
स्वतःचे पक्के घर असावे. हे रामचंद्र देवलकर व सीताबाई या वृद्ध निराधार दाम्पत्याचे स्वप्न होते. पण ते पुर्ण होईल असा आशेचा किरण त्यांना दिसत नव्हता. दत्तकृपा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. त्याचा आनंद देवलकर दाम्पत्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसला. त्यामुळेच प्रतिष्ठानने त्यांच्या घराला 'स्वप्नपूर्ती' नाव दिले. प्रतिष्ठानच्या या कार्याला राजकीय, सामाजिक व्यक्ती, शासकीय कर्मचारी कामगार तसेच अनेक दानशुर व्यक्ती आणि स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.