बागायतींवर बदलत्या वातावरणाची तलवार

By admin | Published: March 18, 2016 09:15 PM2016-03-18T21:15:50+5:302016-03-18T23:58:58+5:30

ऐन हंगामात भीतीचे सावट : शेतकरी धास्तावले

Swarms of changing environments on horticulture | बागायतींवर बदलत्या वातावरणाची तलवार

बागायतींवर बदलत्या वातावरणाची तलवार

Next

कडावल : पाऊस व पाऊससदृश वातावरण, प्रचंड उकाडा, थंडी अशा सतत बदलत्या वातावरणाचा आंबा, काजू बागायतींवर अनिष्ट परिणाम होत आहे. पावसाअभावी आधीच भातशेती हातची गेलेली असताना आता निसर्गाच्या फटक्याने बागायतीही धोक्यात येऊ लागल्या आहेते. ऐन हंगामातच बदलत्या वातावरणाची टांगती तलवार असलेल्या बागायती शेतकरी धास्तावले असून, भातशेती गेली आता बागातरी वाचणार का? अशी भीती व्यक्त होत आहे.
यंदा पावसाअभावी खरीप भात हंगाम तोट्यात गेला. भातशेती तोट्यात गेली. निदान बागायतींपासून तरी चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर असलेला शेतकरी बागायतीवर लक्ष देत अविरत कष्ट करीत राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त बागायती पिकांवर होती. मोहरधारणा काळात थंडीचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे परिसरातील आंबा, काजूच्या वृक्षांना चांगला मोहोर आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. यंदा फलधारणा चांगली होणार, या आशेने शेतकरी सुखी होता; पण ऐन हंगामातच निसर्गाने पुन्हा मेटाकुटीला आणले आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या वातावरणामुळे बागायतीवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चांगली फलधारणा होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे.
दिवसभरात वातावरण व तापमानात अनेकवेळा बदल होत आहे. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत थंडी असते. सकाळनंतर उष्णतामान वाढण्यास सुरुवात होते. दुपारच्यावेळी तर उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होते. दिवसा वातावरण ढगाळ व पाऊससदृश असते. काही भागात पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या आहेत. बदलत्या वातावरणाचा परिणाम येथील आंबा, काजू व सुपारी बागायतींवर होत आहे.
परिसरातील कडावल, हिर्लोक, किनळोस, डिगस, वेताळबांबार्डे, रांगणातुळसुली, आवळेगाव, आदी गावांतील शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन बागायती उभ्या केल्या आहेत. बागायती धोक्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावले असून, भवितव्याबाबत त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (वार्ताहर)

Web Title: Swarms of changing environments on horticulture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.