स्वतंत्र कोकणचे प्रणेते प्रा. महेंद्र नाटेकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 05:10 PM2022-03-16T17:10:14+5:302022-03-16T17:17:35+5:30
गोव्याप्रमाणे कोकणचीही सर्वांगिण प्रगती व्हावी यासाठी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचा ध्यास घेतला होता. स्वतंत्र कोकण, सोनवडे घाटमार्गसह पेन्शनरला न्याय मिळावा यासाठीही ते सतत झटत राहिले.
कणकवली : स्वतंत्र कोकण संघटनेचे प्रणेते तसेच सोनवडे घाटमार्गासाठी गेली चाळीस वर्षे लढा देणारे प्रा. महेंद्र नाटेकर यांचे आज बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवा बांबुळी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या (गुरुवारी) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
महेंद्र नाटेकर सर यांनी गेली वीस वर्षे पेन्शनर संघटनेसाठीही धडाडीने कार्य केले होते. सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांतही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाबद्दल सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
प्रा. नाटेकर यांनी शिक्षण पूर्ण झाल्यांनतर मुंबई, पुणे येथे आलेल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या डावलून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभवडे (ता.कुडाळ) येथील दुर्गम गावामध्ये कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन सुरू केले होते. त्यानंतर त्याच कॉलेजमध्ये ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.
या कालावधीत विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी परवड पाहून त्यांनी चाळीस वषापूर्वी सोनवडे घाटमार्गासाठी लढा सुरू केला होता. स्थानिक ग्रामस्थांना एकत्र आणून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या काळात सोनवडे घाटमार्गाला मंजूरीही मिळवून आणली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्येही ते निवडून आले होते. मात्र त्यांनतर राजकारणात न जाता त्यांनी कोकणातील तरूणांना इथेच नोकऱ्या मिळाव्यात. गोव्याप्रमाणे कोकणचीही सर्वांगिण प्रगती व्हावी यासाठी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचा ध्यास घेतला होता. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत त्यांनी झंझावाती दौरेही केले होते. अनेक नाटकेही त्यांनी लिहिली. स्वतंत्र कोकण, सोनवडे घाटमार्गसह पेन्शनरला न्याय मिळावा यासाठीही ते सतत झटत राहिले.