विनायक राऊत यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:40 PM2021-02-13T16:40:16+5:302021-02-13T16:42:41+5:30
Bjp sawantwadi sindhudurgnews -माजी खासदार नीलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना कुठेही मिळाल्यावर फटकावू असे म्हणताच त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर शिवसेना-भाजपमधील वाद चांगलाच वाढत गेला असून, शुक्रवारी शिवसेनेने नीलेश राणे यांचा पुतळा जाळला; तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सावंतवाडीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळून त्याला चप्पल मार आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सालईवाडा परिसरात करण्यात आले.
सावंतवाडी : माजी खासदार नीलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना कुठेही मिळाल्यावर फटकावू असे म्हणताच त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर शिवसेना-भाजपमधील वाद चांगलाच वाढत गेला असून, शुक्रवारी शिवसेनेने नीलेश राणे यांचा पुतळा जाळला; तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सावंतवाडीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळून त्याला चप्पल मार आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सालईवाडा परिसरात करण्यात आले.
यामध्ये नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान, नगरसेविका दीपाली भालेकर, परिणिती वर्तक, बंटी पुरोहित, सभापती मीनल धुरी आदी सहभागी झाले होते.
गेले चार दिवस शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. त्याचा दुसरा अंक शुक्रवारी जिल्ह्यात पाहायला मिळाला. ओरोस येथे माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत आंदोलन केल्याचे ताजे असतानाच सावंतवाडीत खासदार विनायक राऊत यांंच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वत: हातात चप्पल घेऊन राऊत यांंच्या पुतळ्याला जोडे मार आंदोलन केले. भाजपने अचानक आंदोलन केल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस मात्र दिसले नाहीत. या आंदोलनानंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली होती.