यंत्रणा अद्ययावत हवी
By admin | Published: July 8, 2014 12:41 AM2014-07-08T00:41:39+5:302014-07-08T00:42:40+5:30
ई. रविंद्रन : आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक
ओरोस : आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा उपलब्ध असली तरी ती अद्ययावत असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सर्व यंत्रणा कार्यान्वित असणेही गरजेचे आहे. शासनाच्या विभागानी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील यंत्रणांचे संवादाची सर्व यादी, माहिती अद्ययावत करण्यात यावी या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नयेत याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण अंतर्गत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपविभागीय अधिकारी संतोष भिसे (कणकवली), रविंद्र बोंबले (कुडाळ), जिल्हास्तरीय सर्व खात्यांचे विभागप्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, सर्व विभागानी आपत्ती व्यवस्थापनची कार्यवाही काटेकोरपणे करावी. जिल्हा परिषद अखत्यारीतील रस्ते, साकव दुरुस्ती करून घेण्यात यावी. आपत्ती काळात निवाऱ्यासाठी निवडलेल्या शाळांबाबत सद्यस्थिती माहिती अद्ययावत करण्यात यावी, मुख्याधिकारी नगरपालिका यांनी नगरपालिका क्षेत्र नाले साफसफाई, पूर नियोजन, धोकादायक इमारतींबाबत योग्य ती उपाययोजना करावी. पाटबंधारे विभागांनी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन व विसर्गाचे नियोजन करून ठेवावे. पूर प्रतिबंधक आराखडा अद्ययावत करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. पर्यटनासाठी होडीमधून प्रवास केला जातो. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याकडेही मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात. प्रवासी वाहतूक करणाऱ्या संबंधित पर्यटक होडीमध्ये लाईफ जॅकेटच उपलब्ध नसल्याचे आढळून आलेले आहे. तरी ही बाब गंभीर असून अशाप्रकारे प्रवासी वाहतूक सुरु आहे. बंदर अधिकाऱ्यांनी तातडीने सिंधुदुर्ग किल्ला किंवा पर्यटक वाहतूक करीत असलेल्या बोटीत लाईफ जॅकेट उपलब्ध करून देऊन त्याचा तात्काळ अहवाल कळवावा. तसेच आपत्कालीन कालावधीतील उपाययोजना व माहितीचा अहवाल तात्काळ कळवावा.
जिल्हाधिकारी म्हणाले, कृषी विभागाने पूरप्रवण क्षेत्रातील झालेले नुकसान स्थानिक प्रशासनाकडून माहिती प्राप्त करून त्याचा अहवाल साद करावा. वन विभागाने वन विभागाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. यावेळी प्रत्येक विभागाने माहिती अद्ययावत असून जिल्हास्तरीय आपत्ती यंत्रणेकडे देण्यात आली असल्याचे बैठकीत सांगितले. (वार्ताहर)