दूरसंचार कार्यालयाला टाळे ठोका, खासदार विनायक राऊतांचा अधिकाऱ्यांवर संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:57 PM2018-06-22T23:57:16+5:302018-06-22T23:57:29+5:30
सावंतवाडी : महामार्गाचे काम सुरू असल्याच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरसंचार यंत्रणा ठप्प आहे. जिल्ह्यातील तब्बल १५ हजार टेलिफोन बंद आहेत. मग दूरसंचार कार्यालय हवे तरी कशाला? त्याला टाळे ठोका, असा संताप खासदार विनायक राऊत अधिका-यांवर काढला. माझ्या तळगाव येथील घरचा फोन तीन महिने सुरू करू शकत नाही मग अधिकारी करतात तरी काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी येथील दूरसंचार कार्यालयाला भेट दिली व दूरसंचारच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच येत्या एक महिन्यात काम सुधारा अन्यथा अधिका-यांवर कारवाईसाठी भाग पाडू, असा सज्जड दमही त्यांनी भरला. यावेळी दूरसंचारच्या वतीने वरिष्ठ व्यवस्थापक संजयकुमार चौधरी, सिंधुदुर्गाचे उपमहाव्यवस्थापक क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, विक्रांत सावंत, रूपेश राऊळ, राजू राऊळ, चंदक्रांत कासार, अशोक दळवी, सोमा घाडीगावकर, नाना पेडणेकर, सागर नाणोस्कर, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.
खासदार राऊत यांनी जिल्ह्यातील दूरसंचारच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी राऊत यांनी जिल्ह्यात बीएसएनएल सेवा सर्वत्र विस्कळीत आहे. त्याचे कारण काय? त्यावर अधिका-यांनी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे केबल तुटतात. याचा फटका दूरसंचारला बसतो, असे उत्तर दिले. त्यावर खासदार राऊत यांनी जिल्ह्यात दूरसंचारचे किती टेलिफोन आहेत आणि सध्या किती बंद आहेत, असे विचारले. त्याला अधिका-यांनी एक हजार टेलिफोन बंद आहे, असे सांगितले. त्यावर खासदार राऊत यांनी एक हजार काय सांगत एक ओरोसमध्येच तेवढे होतील. पूर्ण जिल्ह्यात पंधरा हजार टेलिफोन बंद आहे. माझ्या घरचा फेबु्रवारीमध्ये टेलिफोन बंद आहे. तो अद्याप सुरू झाला नाही. अधिका-यांना सांगूनही त्यावर कारवाई झाली नाही. असे अधिकारी काय कामाचे? जर तुम्हाला कामच नसेल तर कार्यालयाला टाळे ठोका. एक अधिकारी जाग्यावर नसतो. जिल्ह्याचे उपमहाव्यवस्थापक क्षीरसागर हे कायम सुट्टीवर असतात. मग त्यांना जिल्ह्यात थांबायचे नसेल तर त्यांनी खुशाल जावे, असे खासदार राऊत यांनी अधिका-यांना सांगितले.
जिल्ह्यात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. त्यात काही अधिकारी राजकारण करतात. त्यामुळे दूरसंचारचा तोेटा होत आहे. मी मांडलेले प्रश्न एका महिन्यात सुटले नाहीत तर गप्प बसणार नाही, असा सज्जड दमही राऊत यांनी दिला आहे. तसेच महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे जेथे केबल आहे तेथे तुमचे कर्मचारी ठेवा. म्हणजे त्यात अडथळे येणार नाहीत, असेही राऊत म्हणाले. जे टॉवर मंजूर झाले आहेत त्यांची कामे योग्य पद्धतीने तपासून घ्या तसेच टॉवर लवकरात लवकर कसे सुरू होतील ते पाहा. जे अधिकरी व कर्मचारी कमी असतील तर त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल द्या, असेही राऊत यांनी वरिष्ठ व्यवस्थापक चौधरी यांना सांगितले आहे.
अधिकारीच करतात राजकारण
बीएसएनएलचे काही अधिकारी टॉवरच्या बाबतीत गावात जाऊन राजकारण करतात. त्यांच्या काही तक्रारी माझ्याकडे आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे खासदार राऊत यांनी अधिका-यांना सांगितले. तसेच शिरोडा, फणसगाव येथील टॉवर लवकरात लवकर सुरू करा, अशा सूचना यावेळी दिल्या.