सिंधुदुर्गनगरीत तंबाखू विरोधी जनजागृती रॅली, तंबाखूमुक्त जीवन जगा : शरद कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 02:58 PM2018-06-02T14:58:59+5:302018-06-02T14:58:59+5:30
तंबाखू सेवनामुळे कर्करोगाचा धोका हा मोठा आहे. त्याचबरोबर हृदय रोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे तरुणांनी व नागरिकांनी तंबाखूच्या व्यसनापासून लांब रहावे आणि तंबाखूमुक्त जीवन जगावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शरद कुलकर्णी यांनी तंबाखू विरोधी दिन जनजागृती रॅली प्रसंगी केले.
सिंधुदुर्गनगरी : तंबाखू सेवनामुळे कर्करोगाचा धोका हा मोठा आहे. त्याचबरोबर हृदय रोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे तरुणांनी व नागरिकांनी तंबाखूच्या व्यसनापासून लांब रहावे आणि तंबाखूमुक्त जीवन जगावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शरद कुलकर्णी यांनी तंबाखू विरोधी दिन जनजागृती रॅली प्रसंगी केले.
कर्करोगाचे वाढते प्रमाण हे तंबाखू सेवनात दडले असल्याने तंबाखूच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरुन प्रयत्न केले जात आहेत. ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाने राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत जनजागृती रॅली काढून तंबाखूपासून दूर राहण्याचा संदेश दिला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शरद कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी सुनिल पाटील, कार्यक्रम व्यवस्थापक संतोष सावंत, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नदाप, डॉ पौर्णिमा बिडे, डॉ.शौनक पाटील, कर्मचारी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आदी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
आठ शाळा तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम हाती घेण्यात आला असून विविध ११ निकष पूर्ण करणाऱ्या शाळा तंबाखूमुक्त शाळा घोषित केल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत ९० शाळांच्या भेटी पूर्ण झाल्या असून यापैकी ८ शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये विद्यामंदिर कणकवली, एस.एम. हायस्कूल कणकवली, कळसुली इंग्लिश स्कूल, एस.एल.देसाई विद्यालय पाट, आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली, वराडकर हायस्कूल कट्टा या सहा माध्यमिक विद्यालयांचा तर जिल्हा परिषद शाळा ओरोस आणि शाळा देवबाग या दोन प्राथमिक शाळांचा समावेश आहे.
जनजागृती पंधरवडा साजरा केला जाणार
जिल्हा परिषदेसमोर रॅली पोहोचताच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्ध्यांनी तंबाखूचे दुष्परिणाम दाखविणारे पथनाट्य सादर केले. तसेच उपस्थितांनी स्वत:बरोबरच परिसर आणि राष्ट्र तंबाखूमुक्त करण्याची शपथ घेतली. सायंकाळी जिल्हा न्यायालयातही तंबाखू जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम व आजार याबाबत जनजागृती ह्यपंधरवडाह्ण साजरा केला जाणार आहे. यावेळी ग्रामपंचायत, तलाठी, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, आठवडा बाजार आदी ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहितीही यावेळी शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनी दिली.