ठेकेदारावर कारवाई करा; अन्यथा उपोषण :मंगेश लोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 05:32 PM2021-03-17T17:32:51+5:302021-03-17T17:35:00+5:30
vaibhavwadi PanchyatSamiti Sindhudurg- सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या एडगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आपणास उपोषणास बसावे लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत दिला.
वैभववाडी : सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या एडगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आपणास उपोषणास बसावे लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत दिला.
सभापती अक्षता डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. यावेळी उपसभापती अरविंद रावराणे, सदस्या हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक गटविकास अधिकारी शुभदा पाटील आदी उपस्थित होते.
एडगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम २०१३ मध्ये मंजूर होऊन त्याचवेळी सुरूही झाले. परंतु सुरुवातीचे काही काम केल्यानंतर वेळकाढू धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ते काम सात वर्षे अपूर्णावस्थेत आहे. लाखोंचा निधी मंजूर असूनही एडगाव पवारवाडीतील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजमितीस सुटू शकलेला नाही, अशी नाराजी व्यक्त केली.
घरबांधणी परवानगीचा मुद्दा उपसभापती रावराणे यांनी उपस्थित केला. नगरपंचायत कार्यक्षेत्रात घरबांधणी परवाना मिळविताना नागरिकांना घाम फुटतो. किमान ग्रामपंचायत क्षेत्रातील परवानगी प्रकिया सुटसुटीत असायला हवी, असे सांगितले. त्यावर परब यांनी, १५०० स्क्वेअर फूट बांधकाम परवानगीचे अधिकार शासनाने ग्रामपंचायतींना दिले आहेत. अकृषक अटही रद्द केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची सूचना
एडगावच्या अपूर्ण नळ योजनेसाठी मंगेश लोके यांनी उपोषणाचा इशारा देताच गटविकास अधिकारी परब यांनी, ज्या ठेकेदारामुळे हे काम रखडले आहे, त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी सूचना केली. त्यामुळे खरंच अशी कारवाई होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
कोरोना वाढतोय; सतर्कता बाळगावी
कोरोनाला रोखण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभागाने अतिशय चांगले काम केलेले आहे. आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने पूर्वीप्रमाणे तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सभापती डाफळे यांनी केले.