कारवाई मागे घ्या, मग फोटो लावतो
By admin | Published: December 7, 2015 11:22 PM2015-12-07T23:22:44+5:302015-12-08T00:38:08+5:30
नगरपंचायतीमध्ये कॉँग्रेसअंतर्गत राजकारण : काढलेले फोटो लावण्यासाठी आग्रह
कणकवली : नगराध्यक्ष निवडीवरून झालेल्या राजकीय घडामोडीनंतर नगरपंचायतीमधील नारायण राणे यांची छायाचित्रे काढून टाकण्यात आली. सोमवारी कॉँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीत धडक मारत राणेंचे छायाचित्र पुन्हा लावण्याची मागणी केली. मात्र, आधी कारवाई मागे घ्या मग फोटो लावतो, असा पेच टाकत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी हा डाव उधळून लावला. नगराध्यक्ष निवडीनंतर नगरपंचायतीमधील कॉँग्रेस नेते नारायण राणे यांचे फोटो काढण्यात आले होते. त्या जागी प. पू. भालचंद्र महाराजांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे कॉँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली होती. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची भेट घेतली. यावेळी बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर, सोमा गायकवाड उपस्थित होते. सुरेश सावंत यांनी नगरपंचायतमधील नारायण राणे यांची छायाचित्रे काढल्याबद्दल आक्षेप नोंदवला. तुम्ही स्वत:ला कॉँग्रेसचे म्हणवता तर राणेंचे फोटो का काढले? असा प्रश्न केला. उपनगराध्यक्ष पारकर यांनी आमची बाजू समजून घ्या, असे सांगितले. आम्ही आतापर्यंत कॉँग्रेसचे ्रप्रामाणिकपणे काम केले. परंतु काही व्यक्ती राजकीय डावपेच करत आम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बांधकाम सभापतीपद रूपेश नार्वेकर यांना नारायण राणे यांच्या आदेशाने मिळाले. नगराध्यक्षपदी प्रज्ञा खोत राणे यांच्या आदेशानंतरच झाल्या. परंतु अलिकडच्या काही काळात संदेश पारकर गटाच्या नगरसेवकांमध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न झाला. आमचे नेते संदेश पारकर यांच्या म्हणण्यानुसार झाले असते तर आमचा नगराध्यक्षपदासाठी सुविधा साटम यांनाही विरोध नव्हता. असे न होता आमच्या गटातील काहींना आमीष दाखवून आमच्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न झाला. नार्वेकर सभापती झाल्यानंतरही राणे यांचे फोटो भिंतीवर होते. नंतर मात्र आमच्यावर कारवाई करण्यासंबंधी पत्र पाठवण्यात आले. आम्ही असे कोणते पक्षविरोधी काम केले आहे? असा प्रश्न कन्हैया पारकर यांनी केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश पटेल, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप मेस्त्री, उपाध्यक्ष शशी राणे, मिलिंद मेस्त्री, सोनू सावंत, अजय सावंत, सुशील सावंत, दत्ता काटे, सुनील साळसकर, सचिन पारधिये, पवन भोगले, मनोज जाधव, गौरव यादव, हनुमंत बोंद्रे, लवू परब, विक्रम राणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वरिष्ठांकडे बाजू मांडा : चर्चा करुन निर्णय घेणार