वादग्रस्त मुख्याध्यापकावर कारवाई करा
By admin | Published: December 6, 2015 10:18 PM2015-12-06T22:18:23+5:302015-12-07T00:21:12+5:30
सभापतींचा आदेश : कणकवली पंचायत समिती बैठक
कणकवली : खारेपाटण उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आतापर्यंतच्या कारकिर्दीत शिक्षकांना त्रास दिल्याची शिक्षण विभागाकडूनच कबुली मिळत आहे. अशा वादग्रस्त मुख्याध्यापकावर अद्याप कारवाई का नाही? असा प्रश्न पंचायत समिती सभेत उपस्थित करण्यात आला. सांगवे शाळा नं.१ उपशिक्षिकेची बदली पर्यायी शिक्षक दिल्याशिवाय झाली. बदली शिक्षक न मिळाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा सदस्यांकडून देण्यात आला.कणकवली पंचायत समितीची सभा येथील प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती आस्था सर्पे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, सहायक गटविकास अधिकारी मुश्ताक गवंडी उपस्थित होते. खारेपाटण उर्दू शाळेत रिक्त पदावर हुंबरठ उर्दू शाळेतील शिक्षकाची बदली करण्यात आली आहे. मात्र, खारेपाटण येथे शिक्षक येण्यास तयार नाहीत. खारेपाटण उर्दू शाळेचे मुख्याध्यापक हे छोट्या छोट्या कारणासाठी त्रास देत असल्याची ख्याती असल्याने कोणी शिक्षक त्यांच्या हाताखाली काम करण्यास तयार नाहीत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शिक्षक दोन दिवसांत हजर झाले नाहीत तर त्यापुढील परिणामास आम्ही जबाबदार नाही, असा इशारा दादा कर्ले यांनी दिला. नांदगाव येथील शिक्षकांना सोमवारपर्यंत हजर करतो, असे आश्वासन शिक्षण विभागातर्फे देण्यात आले. बबन हळदिवे यांनी शिक्षक लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत. खात्याचे अधिकारी अशा शिक्षकांवर काय कारवाई करतात? असा प्रश्न केला. वादग्रस्त मुख्याध्यापकांवर कारवाई करून त्याचा अहवाल पुढील बैठकीत द्यावा, असे आदेश सभापतींनी दिले. सांगवे शाळा नं.१ मधील उपशिक्षिकेची आंतरजिल्हा बदली करण्यात आली. पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय शाळेतील शिक्षकाला सोडू नये असा शासन आदेश असताना उपशिक्षिकेला का सोडले? असा प्रश्न सुरेश सावंत यांनी केला. विस्तार अधिकारी वडर यांनी पर्यायी व्यवस्था लवकरच करतो, असे सांगितले.दोन दिवसांत पर्यायी व्यवस्था करा, असा सभापती सर्पे यांनी आदेश दिला. वनखात्याच्याच्या उत्पन्नातून ७ टक्के अनुदान ग्रामपंचायतींना दिले जाते का? त्यातून ग्रामपंचायतींनी कोणती कामे आतापर्यंत केली? याचा खुलासा व्हावा, अशी सूचना हळदिवे यांनी केली. (प्रतिनिधी)
भातपीक स्पर्धेत सावंत प्रथम
खरीप हंगाम भातपीक स्पर्धेत तालुक्यातील दहा शेतकरी सहभागी झाले. यापैकी नरडवे येथील रमाकांत सावंत (१६७ क्विंटल/हेक्टर) यांचा प्रथम क्रमांक आला, तर फोंडा येथील विलास पारकर (७८ क्ंिवटल/हेक्टर) यांचा द्वितीय क्रमांक आला आहे. सिंधु शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी अनिल पेडणेकर यांचे नाव वारंवार सुचविण्यात येते. मात्र, दुसरा शेतकरी तयार करण्यास कृषी विभागाला यश का येत नाही? असा प्रश्न सुरेश सावंत यांनी केला.
कारवाईचा अधिकार नाही
करंजे, घोणसरी, पियाळी, वाघेरी गावांना वायरमन नसल्याने विजेची समस्या मार्गी लागत नाही. वारंवार याबाबत आवाज उठवूनही वायरमन मिळत नसेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, असे बबन हळदिवे यांनी सांगितले असता सभापतींनी त्यांच्यावर कारवाईचा सभागृहास अधिकार नाही. औपचारिक पत्र पाठवू शकतो, असे सांगितले. मात्र, अधिकारच नसेल तर प्रश्न उपस्थित करून काय उपयोग? आंदोलन केल्याशिवाय प्रश्न मिटणार नाहीत काय? असा उद्वीग्न सवाल हळदिवे यांनी केला.
..नाहीतर बीडीओ बदला
एमआरईजीएस अंतर्गत कामे होऊनही अद्याप ‘मस्टर’ तयार करण्यात आलेली नाहीत. तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी १ अभियंता आहे. नोव्हेंबरमध्ये मस्टर लावतो, असे आश्वासन देऊन अद्याप एकही मस्टर लावण्यात आलेले नाही. अनेक ग्रामपंचायतींचा ६०-४० चा ‘रेशो’ साधूनही मूल्यांकन कमी का? आराखडा करतानाच रेशो साधला का जात नाही. कणकवलीत उद्दिष्टपूर्तीसाठी कामे केली जातात. त्यात लाभार्थ्यांचे नुकसान होते, अशी नाराजी महेश गुरव यांनी व्यक्त केली.