नि:पक्षपातीपणे कारवाई करा

By Admin | Published: November 19, 2015 10:19 PM2015-11-19T22:19:31+5:302015-11-20T00:17:03+5:30

बलात्कारप्रकरणी पोलिसांना निवेदन : कणकवलीत काँग्रेसच्यावतीने मूकमोर्चा

Take action indiscriminately | नि:पक्षपातीपणे कारवाई करा

नि:पक्षपातीपणे कारवाई करा

googlenewsNext

कणकवली : कणकवलीत घडलेल्या महिला सामूहिक बलात्कार प्रकरणात सत्तारुढ पक्षाचे कार्यकर्ते सहभागी आहेत. त्यामुळे कुणाच्याही दबावाला बळी न पडता नि:पक्षपातीपणे पोलिसांनी कारवाई करून दोषी असलेल्यांना कडक शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मूक मोर्चा काढत एका निवेदनाद्वारे काँग्रेसच्यावतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेस संपर्क कार्यालयाकडून पोलीस स्थानकापर्यंत गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढला. तसेच जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांची भेट घेतली तसेच निवेदन सादर केले.
या भेटीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, पंचायत समिती उपसभापती बाबासाहेब वर्देकर, महेश गुरव, माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, किशोर राणे, बंडू हर्णे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. युती शासनाची सत्ता आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखीन दोन-तीन आरोपींचा समावेश असल्याची चर्चा शहरात असून त्यांचीही चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. त्यामुळे तिला सुरक्षितता पुरविण्यात यावी.
या महिलेवर दबाव आणून तक्रार मागे घेण्यास तिला भाग पाडले जावू शकते. तसे होऊ नये यासाठी पोलिसांनी काळजी घ्यावी, असे सतीश सावंत यांनी सांगितले.
तसेच या प्रकरणामुळे कणकवली शहराची बदनामी झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास मोकाट सुटलेले आरोपी उजळ माथ्याने शहरात फिरताना दिसतात. हे समाजहिताच्या दृष्टीने घातक आहे, असे मेघा गांगण यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह तसेच शहरातील अन्य जागांचा गैरवापर करण्यात येत असेल तर पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी सुरेश सावंत यांनी केली. (वार्ताहर)


सतीश सावंत : दहशत कोणाची हे जनतेसमोर आले
कणकवलीत अत्याचार प्रकरण घडल्यानंतर या प्रकरणात सहभागी असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी काही राजकीय नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे नेमकी दहशत कोणाची आहे हे या निमित्ताने जनतेसमोर आले आहे. काँग्रेसवर दहशतीचा आरोप करण्याअगोदर या लोकांनी आत्मपरिक्षण करावे आणि त्यानंतरच दुसऱ्यांवर आरोप करावेत. या प्रकरणाचा शांततेच्या मार्गाने निषेध करीत काँग्रेसच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.

पोलिसांचे केले अभिनंदन
कणकवलीत घडलेल्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक केली.
त्यांच्या या कर्तव्य तत्परतेबद्दल काँग्रेसच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
या प्रकरणात शिष्टाई करण्यासाठी येणाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.

Web Title: Take action indiscriminately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.