प्रशासनाला सोबत घेऊन जिल्ह्याचा
By admin | Published: February 3, 2015 09:59 PM2015-02-03T21:59:43+5:302015-02-03T23:54:37+5:30
विकास करणार : दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी : सर्वांचा आदर ठेवणे हे माझे मी कर्तव्य समजतो. मला प्रेमाने सर्वांना जिंकायचे आहे. समिती सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊनच व त्यांचा विश्वास संपादन करूनच जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक सोमवारी तब्बल आठ तास यशस्वीपणे झाल्यानंतर सिंधुदुर्गनगरीत पत्रकार परिषदेत पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी केसरकर म्हणाले, गोवा राज्यातील प्रवेशासाठी वाहन कर रद्द व्हावा, ही माझी आग्रही भूमिका आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करूनच नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. कारण हा निर्णय विशेष बाब म्हणून घ्यावा लागणार आहे. जिल्हा नियोजनमधून संपूर्ण जिल्ह्याचाच विकास करायचा आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तेव्हा कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही. लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्येक तालुक्याला कमी-अधिक प्रमाणात विकासकामांना निधी दिला जाईल. प्रत्येक सदस्यांची सूचना लक्षात घेऊनच तसेच सुचविलेल्या कामांना निश्चित न्याय दिला जाईल. जिल्ह्याचा विकास हे माझे ध्येय आहे. त्यामुळे प्रत्येक नियोजन समिती सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन तसेच त्यांना विश्वासात घेऊनच मला काम करायचे आहे, असे म्हणाले. ते म्हणाले, जिल्हा नियोजन समितीतही सर्वांना बोलण्याची संधी दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काहीवेळा माझे अधिकार वापरून निधी अखर्चित ठेवणाऱ्या, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज दिली. चांगले काम करा. आमच्याकडून नेहमी प्रेमाची वागणूक मिळेल. तसेच सर्व सदस्यांनीही सहकार्याच्यादृष्टीने प्रश्न उपस्थित करा. विकासात राजकारण नको. मला माझे अधिकार वापरायचे नाहीत आणि ती वेळ येऊ नये, असे सांगितले. आजच्या सभेत ७० कोटींच्या नियोजन आराखड्यास मंजुरी देण्यात आली, तर सन २०१४-१५चा मंजूर निधी मार्चअखेर शंभर टक्के करण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे, असे आदेश दिले आहेत. यापुढे ती तब्बल दहा तास चालवायला लागली तरी ती समिती सदस्यांचे समाधान होईपर्यंत चालविण्याची तयारी असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, जिल्हा नियोजन अधिकारी धोंडीबा थोरात उपस्थित होते. (प्रतिनिधी)