‘लाईफ लाईन एक्स्प्रेस’चा लाभ घ्या

By Admin | Published: April 16, 2017 10:55 PM2017-04-16T22:55:57+5:302017-04-16T22:55:57+5:30

उदय चौधरी; सुरेश प्रभूंच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ

Take advantage of 'Life Line Express' | ‘लाईफ लाईन एक्स्प्रेस’चा लाभ घ्या

‘लाईफ लाईन एक्स्प्रेस’चा लाभ घ्या

googlenewsNext



ओरोस : लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये २० विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. स्तनाच्या व तोंडाच्या कॅन्सरचे पूर्व निदान, दंतोपचार, कानाचे आजार, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, डोळे तपासणी अशाप्रकारच्या आरोग्य तपासण्या व शस्त्रक्रिया या लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये केल्या जाणार आहेत. या आरोग्य सुविधांचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानकावर आयोजित लाईफ लाईन एक्स्प्रेसच्या उद्घाटनप्रसंगी केले.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गनगरी, विशाखापट्टण, भुवनेश्वर या तीन ठिकाणच्या लाईफ लाईन एक्स्प्रेस सुविधेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानकावर आयोजित कार्यक्रमास माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, विजय केनवडेकर, आदी उपस्थित होते.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने सिंधुदुर्गात प्रथमच लाईफ लाईन एक्स्प्रेसचे आगमन होत आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. याबाबत त्यांचे आभार मानून जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, सिंधुदुर्गात विशेषत: स्त्री रोगांच्या (ब्रेस्ट कॅन्सर किंवा मुख कॅन्सर) पूर्व तपासणीची सोय नाही; पण या लाईफ लाईन एक्स्प्रेसमुळे ही सुविधा मोफत उपलब्ध झाली. याचा लाभ विशेषत: महिलांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह म्हणाले की, या लाईफ लाईन एक्स्प्रेस सुविधेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील इच्छुक रुग्णांना या ठिकाणी आणण्याची व्यवस्था केली आहे.
ब्रेस्ट कॅन्सर किंवा मुख कॅन्सर पूर्व निदानासाठी आवश्यक असलेले मॅनोग्राफी हे यंत्र या एक्स्प्रेसमध्ये उपलब्ध आहे. याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त इच्छुक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. लाईफ लाईन एक्स्प्रेसद्वारे तीन दिवसांची ही आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया मोहीम यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आश्रमातील रुग्णांची तपासणी करण्याची सूचना
जिल्हावासीयांच्या आरोग्य सेवेसाठी लाईफ लाईन एक्स्प्रेस जिल्ह्यात दाखल झाली असून, या चालत्या-फिरत्या हॉस्पिटलचा अनेक रुग्ण लाभ घेत आहेत. यावेळी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यालयाच्या शेजारीच असलेल्या अणाव गावातील आनंदाश्रम व संविताश्रम या आश्रमांमधील रुग्णांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता संबंधित आश्रमातील सर्व रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना देतानाच या रुग्णांना ने-आण करण्यासाठी मोफत रुग्णवाहिका देण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी दिले.

Web Title: Take advantage of 'Life Line Express'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.