गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या; दीपक केसरकरांच्या सूचना

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 15, 2022 02:33 PM2022-08-15T14:33:28+5:302022-08-15T15:18:14+5:30

नियोजन समितीच्या नुतन सभागृहात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची आढावा बैठक  झाली.

Take care that devotees coming for Ganeshotsav are not inconvenienced; Suggestions by Minister Deepak Kesarkar | गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या; दीपक केसरकरांच्या सूचना

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या; दीपक केसरकरांच्या सूचना

Next

सिंधुदुर्ग  : अवघ्या १५ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी दिल्या. येथील नियोजन समितीच्या नुतन सभागृहात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची आढावा बैठक  झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. 

राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी साठत असलेल्या पाण्याची समस्या सोडवण्याची सूचना करून शालेय शिक्षण मंत्री  केसरकर म्हणाले, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. हे खड्डे बुजवत असताना कोल्ड मिक्स पद्धतीने बुजवावेत. सर्व स्ट्रीट लाईट सुरू करण्याची कार्यवाही करावी. बंदर विभागाने त्यांच्या गस्तीनौका तातडीने प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही करावी. तिलारी पाणी योजना वेळेत पूर्ण होईल यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नियोजन करावे.

एमआयडीसी विभागाने आडाळी एमआयडीसी भूखंड वाटपाचे काम सुरू करावे. आरोग्य विभागाने गणेशोत्सव काळात साथरोग येणार नाही याचे नियोजन करावे. तसेच या काळात वाहतुक कोंडी होणार नाही यासाठीही नियोजन करण्यात यावे. स्वातंत्र्य सैनिकांची गाथा सांगणाऱ्या राज्यातील पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात असलेल्या ७५ स्वातंत्र्य सैनिकांच्या सचित्र प्रदर्शनाचे केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हरवलेली ७५ सुवर्ण पृष्ठे असे या प्रदर्शनाचे नाव आहे.

 जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सभागृहामध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठाकरवाडी आदिवासी संग्रहालयाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेले पण इतिहासाच्या पानांमध्ये लपलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेतलेल्या ९ सॅटेलाईट फोन्सचे वितरण करण्यात आले. यामध्ये ८ तालुक्यांसाठी ८ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १ सॅटेलाईट फोन घेण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय भूमी अभिलेख अधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई - चावडीसाठीच्या लॅपटॉपचे वितरणही करण्यात आले.

Web Title: Take care that devotees coming for Ganeshotsav are not inconvenienced; Suggestions by Minister Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.