आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करु - राष्ट्रवादी काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 09:43 PM2017-11-20T21:43:53+5:302017-11-20T21:44:10+5:30
कणकवली तालुक्यात लेप्टोचे रुग्ण आढळत असून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सि.एम.शिकलगार यांना देण्यात आला.
कणकवली : कणकवली तालुक्यात लेप्टोचे रुग्ण आढळत असून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सि.एम.शिकलगार यांना देण्यात आला.
येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी धडक दिली. तसेच लेप्टो बाबत तातडिने उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेश पाताड़े , प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभाष सावंत, तालुकाध्यक्ष विलास गावकर, दिलीप वर्णे, दत्ता कल्याणकर, अनीस नाईक, विशाल पेडणेकर, निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले, इम्रान शेख, मनोहर मालंडकर, रविकांत सावंत आदी उपस्थित होते.
रुग्णांची हेळसांड होत असल्याने राष्ट्रवादीच्या वतीने डॉक्टरांना जाब विचारण्यात आला. मागील ३ वर्षांत जिल्ह्याच्या आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे आरोग्यमंत्री असतानाही त्यांचे स्वतःच्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात तापसरी असताना कणकवली रुग्णालयात रोटेशन नुसार महिनाभर फिजिशियन उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, युती काळात केवळ ६ दिवसांसाठी फिजिशियन दिला आहे.
जिल्ह्यातील रुग्णांच्या मरणाला हे सरकार तहानलेले आहे का असा सवाल अबिद नाईक यांनी यावेळी विचारला.
तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्लेटलेट बॅग ठेवाव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा न पुरविल्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या मार्फत हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यात येईल असा
इशारा नाईक यांनी यावेळी दिला. तसेच मागण्यांचे निवेदन डॉ.शिकलगार यांना दिले. दरम्यान, या मागण्यांच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.