अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करा!, अन्यथा..; भाजपच्या शिष्टमंडळाचा पोलिसांना इशारा
By सुधीर राणे | Published: May 30, 2024 03:53 PM2024-05-30T15:53:20+5:302024-05-30T15:54:31+5:30
कणकवली : तालुक्यात गेल्या काही महिन्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत ...
कणकवली: तालुक्यात गेल्या काही महिन्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. गांजा व तत्सम अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध धंद्यांवर पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला आहे.
कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांची गुरुवारी भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तसेच त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कळसुली सरपंच सचिन पारधीये, वागदे सरपंच संदीप सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक गावांपर्यंत अवैध धंद्यांचीपाळेमुळे खोलवर गेलेली असतानाही पोलीस यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे तरुण वर्ग वाईट मार्गाकडे जात आहे. पोलिस केवळ आकडेवारी दाखवण्यासाठी एखाद दुसरी कारवाई करतात. मात्र, त्यानंतर हे अवैध धंदे पुन्हा नव्या जोमाने सुरू झालेले दिसून येतात. पोलिसांनी या सर्व गोष्टींवर तातडीने कडक पावले उचलावीत. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची पुढील दिशा ठरवावी लागेल असेही म्हटले आहे.