जनसुनावणी ३१ डिसेंबरपूर्वी घ्या

By Admin | Published: December 18, 2014 09:44 PM2014-12-18T21:44:44+5:302014-12-19T00:29:57+5:30

संतोष भिसे : इको सेन्सिटिव्ह झोन निश्चितीबाबत कार्यशाळा

Take public hearing before 31st December | जनसुनावणी ३१ डिसेंबरपूर्वी घ्या

जनसुनावणी ३१ डिसेंबरपूर्वी घ्या

googlenewsNext

कणकवली : इको सेन्सिटिव्ह झोन निश्चित करण्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी जनसुनावणी घेऊन गावपातळीवरील अहवाल सादर करण्यात यावा. तसेच तालुकास्तरीय समितीकडे ५ जानेवारीपूर्वी अहवाल सादर करावा, असे सांगतानाच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही तसेच विकासही थांबणार नाही असे नियोजन करून गावाचा संतुलितपणे विकास करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी केले.
येथील भगवती मंगल कार्यालयात गुरुवारी इको सेन्सिटिव्ह झोन निश्चितीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कणकवली तहसीलदार समीर घारे, सहाय्यक गटविकास अधिकारी मुस्ताक गवंडे, तालुका कृषी अधिकारी राठोड, देवगड तहसीलदार जीवन कांबळे, वैभववाडी तहसीलदार विजय जाधव यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपस्थित ग्रामसेवक तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना संतोष भिसे म्हणाले, कणकवली, वैभववाडी, देवगड या तालुक्यातील गावांमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन निश्चित करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनसुनावण्या आयोजित कराव्यात.
सखोल अभ्यासाअंती गावपातळीवर अहवाल तयार करून तालुकास्तरीय समितीकडे तो पाठविल्यानंतर त्यातील त्रुटी दूर केल्या जातील. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडे तालुकास्तरीय अहवाल पाठविला जाईल. जनसुनावणीचे छायाचित्रण करण्याबरोबरच छायाचित्रेही काढण्यात यावीत. ग्रामपंचायतीअंतर्गत वेगवेगळी महसुली गावे असतील तर जनसुनावणी प्रत्येक गावात घेणे आवश्यक आहेत. ग्रामसभा एकत्रितपणे घेतल्यास नियोजनासाठी ते सोयीस्कर ठरेल. इको सेन्सिटिव्ह झोनबाबत सर्व्हे करणाऱ्या व्यक्तीची स्थानिक पातळीवर नियुक्ती करण्यात यावी. त्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन तालुकास्तरावरून करण्यात येईल. एकदा इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाल्यावर त्याठिकाणी विकासाबाबत कृती करणे कठीण होणार आहे. याचा आताच विचार करून तसे नियोजन करण्यात यावे.
तहसीलदार समीर घारे म्हणाले, दिवसेंदिवस जीवसृष्टीचा नाश होत आहे. जैव विविधता टिकवून ठेवणे गरजेचे असून त्यासाठीच इको सेन्सिटिव्ह झोन निर्माण करण्यात येणार आहे. दुर्मीळ वनस्पती, प्राणी, खनिज व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचे रक्षण करण्यासाठी या झोनची आवश्यकता आहे. भावी पिढीच्या भवितव्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांना विश्वासात घेऊन इको सेन्सिटिव्ह झोनबाबत निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील गजानन तळेकर व ग्रामसेवक शिवाजी कांबळे यांनी उपस्थितांना आपल्या गावात इको सेन्सिटिव्ह झोन निश्चितीबाबत करण्यात आलेल्या प्रयत्नांची यावेळी माहिती दिली. (वार्ताहर)

Web Title: Take public hearing before 31st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.