‘सिंधुसरस’ मालवणात घ्या
By admin | Published: February 20, 2015 10:22 PM2015-02-20T22:22:27+5:302015-02-20T23:12:43+5:30
देवानंद चिंदरकर : मालवण पंचायत समिती सभेत ठराव
मालवण : कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुसरस या स्वयंसहाय्यता बचतगटाच्या वस्तू प्रदर्शन विक्री स्टॉलना जिल्ह्यातून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सिंधुसरस या कार्यक्रमाचे स्थळ चुकीचे होते. त्यामुळे हा कार्यक्रम पुढील वर्षी पर्यटन हंगामात मालवण येथे घेण्यात यावा अशी सूचना पंचायत समिती उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी शुक्रवारी बैठकीत केली. या संबंधीचा ठरावही सभेत घेण्यात आला.पंचायत समिती मालवणची मासिक सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी ‘सिंधुसरस’ प्रदर्शनाच्या स्थळाला आक्षेप घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने सिंधुसरस या स्वयंसहाय्यता बचतगटांच्या वस्तू प्रदर्शन विक्रीचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले. वस्तुत: कार्यक्रमाचे स्थळ स्टॉलच्या विक्रीसाठी चुकीचे होते. हा कार्यक्रम ४ ते ५ दिवस सुरु होता. मात्र वस्तूंच्या खरेदी विक्रीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सिंधुसरसमध्ये बांबू, हस्तकला, लाकडी खेळणी, खाद्यपदार्थ, काजू कोकम यासारख्या वस्तूंचे स्टॉल होते. मुळात स्थानिक स्तरावर या वस्तूंची विक्री होणे अशक्य होते. महिलांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. यामुळे सिंधु सरस यासारखे कार्यक्रम पर्यटन हंगामात नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत मालवणमध्ये घेण्यात यावे. याचा फायदा पर्यटकांसह जिल्ह्यातील महिलांना होऊन प्रदर्शनाचा किंबहुना शासनाचा प्रत्येक कुटुंब आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न सफल होईल अशा सूचना चिंदरकर यांनी केल्या. या संबंधीचा ठरावही सभेत घेण्यात आला.यावेळी पंचायत समिती सदस्या श्रद्धा केळुसकर यांनी आंबेरी आरोग्य उपकेंद्रात पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. आंबेरी गावात नळपाणी योजना व्हावी यासाठी आपण पाठपुरावा पंचायत समिती येथे करत असताना याकडे पंचायतीचे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले.यासंबंधी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी नळपाणी योजनेसाठी प्रयत्न करण्यात येतील. तशा सूचना संबंधित विभागाला देण्याचे आश्वासन दिले.यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानिमित्त सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेप्रसंगी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोजरकर, उदय परब, सुजला तांबे, भाग्यता वायंगणकर, चित्रा दळवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सी वर्ल्ड बैठका मालवणात घेण्याचा ठराव
सी वर्ल्ड प्रकल्प तोंडवली, वायंगणी येथे जाहीर झाल्यानंतर प्रकल्पाच्या स्वागताचा ठराव मालवण पंचायत समितीने केला होता. प्रकल्प मालवण तालुक्यात होत असताना बैठका ओरोस, कुडाळ येथे का होतात? सी वर्ल्ड प्रकल्प सादरीकरण किंवा नियोजनाच्या सर्व बैठका मालवणमध्ये यापुढे घेण्यात याव्यात, अशी सूचना उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी केली. याबाबतचा ठराव सभेत घेण्यात आला.