‘झोपा काढो, टोप्या घालो’

By admin | Published: January 20, 2016 11:51 PM2016-01-20T23:51:00+5:302016-01-21T00:25:11+5:30

बंद नळपाणी योजना : अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी आंदोलन

'Take a sleep, make a hat!' | ‘झोपा काढो, टोप्या घालो’

‘झोपा काढो, टोप्या घालो’

Next

रत्नागिरी : जिल्ह्यातील जवळपास १९० गावे आणि ४१८ वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी लाखो रुपये खर्च करून सुरू केलेल्या अनेक नळपाणी योजना बंद आहेत. मात्र, यात दोषी असणाऱ्यांवर प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने जनतेचे हाल होत आहेत. निद्रिस्त असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर पांढऱ्या टोप्या परिधान करून अनोख्या पद्धतीने ‘झोपा काढो टोप्या घालो’ आंदोलन दिवसभर करण्यात येणार असल्याची माहिती गाव विकास समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जिल्ह्यात अनेक गावे व वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महागड्या नळपाणी योजना मंजूर करताना तत्परता दाखवली जाते. मात्र, योजना सुरु झाल्यानंतर ती बंद होण्याबाबत, त्यातील गैरव्यवहाराच्या तक्रारींबाबत तेवढेच दुर्लक्ष केले जाते. याचाच निषेध करण्यासाठी गाव विकास समितीने २६ जानेवारी रोजी ‘झोपा काढो, टोप्या घालो’ आंदोलन पुकारले आहे. त्यानंतर २७ रोजी एक दिवस लाक्षणिक निषेध उपोषण करण्याचा निर्णयही घेतला आहे. याबाबतची माहिती गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, सल्लागार सुहास खंडागळे, सरचिटणीस बाबुराव खेडेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
संगमेश्वर तालुक्यात जवळपास ९ नळपाणी योजना बंद आहेत. हरपुडे, साडवली, चाफवलीतील भोयवाडी, फणसेवाडी, लांबेवाडी, गुरववाडी, ओझरखोल, निलगेवाडी, तळवडे खंडागळेवाडी आदी योजना या गैरव्यवहारांमुुळे बंद आहेत. लाखो रुपये खर्च करून सुरू झालेल्या या योजनांमध्ये ग्रामस्थांना आठ दिवसही पाणी मिळालेले नाही. यामध्ये ६५ लाखांच्या कनकाडी (गोताडवाडी) योजनेचाही समावेश आहे. या ठिकाणी दुरूस्ती न करताच येथे चक्क तीन नव्या योजना राबवण्यात आल्या आहेत. या सर्व अंदाधुंद कारभाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गाव विकास समितीतर्फे करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बंद नळपाणी योजना व बोगस नळपाणी योजनांच्या विरोधात गेल्या तीन वर्षांपासून गाव विकास समिती संघर्ष करत असून, जिल्हा परिषद प्रशासनाकडे याबाबत दाद मागत आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष करण्यात येत असून, दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे या गैरव्यवहाराबाबत कोणतीही कारवाई न करता प्रशासन झोपेचे सोंग घेऊन गप्प आहे. त्यामुळेच आता गाव विकास समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)


प्रातिनिधीक आंदोलन : २३ रोजी प्रत्येक तहसीलसमोर होणार
या आंदोलनानंतरही दोषींवर कारवाई करण्यास दिरंगाई झाली तर जिल्हाभर जनजागृती करण्यासाठी २३ रोजी निवडक सदस्यांसह ‘झोपा काढो टोप्या घालो’ आंदोलन प्रत्येक तहसील कार्यालयासमोर प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात येणार आहे.

Web Title: 'Take a sleep, make a hat!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.