उदय सामंत म्हणाले गाफील राहू नये, कडक कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 04:31 PM2020-04-17T16:31:35+5:302020-04-17T16:32:03+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय अहवाल घेण्यासाठी गुरुवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग तालुका दौरा केला. तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तहसीलदार, पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना कोरोनाबाबत गांभीर्याने घेण्याच्या फक्त सूचना त्यांनी दिल्या.
दोडामार्ग : कोरोना विषाणूच्या प्रतिकारासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अतिदक्षता घेत असल्याने जिल्ह्यात सध्या एकही सदृश रुग्ण नाही. परंतु नऊ लाख जनतेपैकी फक्त एक टक्का लोक मुजोरवृत्तीने विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे ९९ टक्के लोकांचे आरोग्य धोक्यात आणणा-या एक टक्का लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, असे सक्त आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांना दिले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय अहवाल घेण्यासाठी गुरुवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग तालुका दौरा केला. तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तहसीलदार, पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना कोरोनाबाबत गांभीर्याने घेण्याच्या फक्त सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार मोरेश्वर हाडके, पंचायत समिती सभापती संजना कोरगावकर, नगराध्यक्षा लीना कुबल, पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, आरोग्य अधिकारी डॉ. कर्तसकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा उपाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, जिल्हा सरपंच संघाचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई तसेच अन्य कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, संपूर्ण जिल्ह्याचा अहवाल पाहता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झालेला नाही. फक्त एक रुग्ण सदृश होता. मात्र, त्या रुग्णाची आता प्रकृती ठीक असून तो रुग्ण वगळता अद्याप जिल्ह्यात एकही सदृश रुग्ण नाही. मात्र, तरीही जनतेने गाफील राहू नये. शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. जिल्हा प्रशासन गांभीर्याने घेत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावास आळा बसला.
जिल्ह्यातील ९ लाख लोकसंख्येपैकी १ टक्का लोक विनाकारण फिरत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असून त्यांच्यापासून घरात बसलेल्या ९९ टक्के लोकांच्या जीवाला धोका पोहोचवला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश पोलीस यंत्रणेला दिले. नाहक फिरणाºयांंवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
काजूचा दर घसरल्याने दोडामार्ग काजू संघटनेने पालकमंत्र्यांसमोर काजूला हमीभाव मिळण्याचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी शासनाकडे हमीभाव देण्याचा अधिकार नाही. हा निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यावा लागेल. मात्र, आपण जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्याशी चर्चा करून योग्य दर निश्चित करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन सामंत यांनी दिले.
दोडामार्ग रुग्णालयात पुन्हा मणिपाल लॅब सुरू करणार!
कोरोना वगळता सध्या माकडतापाचेही रुग्ण आढळत आहेत. मात्र, केएफडी चाचणी केंद्र जिल्ह्यात नसल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे. दोडामार्ग रुग्णालयात पूर्वी चालू असलेल्या मणिपाल रिसर्च रक्त तपासणी केंद्रामुळे केएफडीचे अहवाल त्वरित समजत होते. मात्र, आता हे रक्त तपासणी केंद्र बंद पडल्याने रक्त नमुने पुणे येथे पाठविले जातात. त्यामुळे तापाचे निदान समजण्यास विलंब होतो. त्यामुळे पुन्हा मणिपाल केंद्र दोडामार्ग रुग्णालयात चालू करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. तापाचे निदान लवकरात लवकर समजल्यावर अशा रुग्णावर तत्काळ उपचार करण्यास सोपे जाईल.
दोडामार्ग तालुक्यात परराज्यातील मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महसूल विभागाच्या तलाठ्यांकडून अशा मजूर वर्गाचे सर्वेक्षण करून तशी नोंदी तहसील कार्यालयात करण्यात यावी व त्यांना अन्नधान्य पुरविण्यात यावे. अन्यथा अन्नाविना त्यांचा बळी जाईल, अशी सूचना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी मांडताच पालकमंत्र्यांनी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात ए-९५ मास्कचा तुटवडा आहे. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांच्या सुरक्षेबाबत कोणतीही दक्षता घेण्यात आली नाही. त्यामुळे तत्काळ एन ९५ मास्क पुरविण्यात यावेत असा आदेश जिल्हा आरोग्य प्रशासनाला त्यांनी दिला. तसेच कसई दोडामार्ग नगरपंचायतीला सॅनिटायझर व मास्क पुरवण्या संदर्भात योग्य सूचना दिल्या. तसेच दोडामार्गमध्ये देण्यात येणाºया शिवभोजन थाळी ५० ऐवजी १०० देण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितले.
सिंधुफोटो ०३
दोडामार्ग तहसील कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोना संदर्भात तालुक्यातील अहवाल जाणून घेतला.