वेळ पडल्यास तलवारी हातात घ्या
By admin | Published: January 22, 2016 11:13 PM2016-01-22T23:13:24+5:302016-01-24T00:40:47+5:30
चंद्रकांतदादा पाटील : कुडाळमधील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आवाहन
कुडाळ : आमचा पक्ष हा सर्वसामान्यांचा असून, कोणाच्या वाटेला आम्ही जात नाही आणि आमच्या वाटेला आला तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असे मी नारायण राणे यांना सांगू इच्छितो. पक्षवाढीच्या कार्यक्रमात कोणीही आले तरी खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुडाळ येथील ‘अतुलनीय सिंधुदुर्ग अतुलनीय कार्यकर्ता’ कार्यक्रमात केले. वेळ पडल्यास तलवारी हातात घ्या, असे आवाहन कार्यकर्त्यांना करत लवकरच अतुल काळसेकर यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांच्या ‘अतुलनीय सिंधुदुर्ग अतुलनीय कार्यकर्ता’ या कार्यवृत्तांत अहवालाचे प्रकाशन व कार्यकर्ता मेळावा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, (पान १ वरून) आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळ माने, अजित गोगटे, राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, बाबा देसाई, अतुल काळसेकर, डॉ. अभय सावंत, काका कुडाळकर, राजू राऊळ, राजश्री धुमाळे, चारूदत्त देसाई, बंड्या सावंत, प्रभाकर सावंत, पुखराज पुरोहित, अर्चना काळसेकर, संतोष शिरसाट, शामकांत काणेकर, नीलेश तेंडुलकर, बाळू देसाई, बब्रुवान भगत, बाबा मोंडकर, सर्फराज नाईक व भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, कोकणच्या विकासासाठी भाजप सरकार नेहमी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रत्येक तालुक्यात एकतरी पणन उद्योग प्रकल्प उभारण्यात यावा. आम्ही सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्ह्यातील महिलांनी नवीन उद्योग उभारावेत. जलयुक्त शिवार या योजनेमुळे राज्यातील अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, आता ही योजना राज्यातील ३३ हजार गावांमध्ये राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पुढची विधानसभा लढविणार : काळसेकर
आज माझ्या कार्यवृत्तांत अहवाल प्रकाशनाला असणाऱ्या उपस्थितीने मी भारावून गेलो आहे. ज्या पक्षात कोणतीही स्पर्धा नाही, त्या पक्षाचे मी काम केले, याचा मला अभिमान आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे घराणेशाहीचे पक्ष आहेत. आमचा पक्ष घराणेशाहीचा पक्ष नाही. तो सर्वसामान्यांचा पक्ष आहे, असे अतुल काळसेकर यांनी सांगून, पुढची विधानसभा मी लढविणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी जाहीर केले.
राणेंच्या दादागिरीला घाबरू नका
जिल्ह्यात राणेंच्या दादागिरीला घाबरू नका. पक्षवाढीसाठी आता जोमाने काम करा. कोणी अडसर करीत असल्यास खपवून घेऊ नका. जिथे सुईने काम होत असेल, ते काम सुईनेच करा. जिथे तलवार वापरावी लागेल, तिथे तलवार वापरा, असे आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
राणेंना जिल्हा सोडायला लावला : जठार
या जिल्ह्यात पंचवीस वर्षे सत्ता गाजवून कोणताही विकास न करता येथे केवळ समस्या निर्माण करणाऱ्या नारायण राणे यांना येथील लोकांनीच जिल्हा सोडायला लावला. त्यांचे दोन पुत्र ‘दो बिचारे बिना सहारे’ बनले असून, ते उगाचच दीपक केसरकर यांच्यावर टीका करीत आहेत, असा टोला जठार यांनी राणेंना लगावला. यावेळी अतुलनीय सिंधुदुर्ग व अतुलनीय कार्यकर्ता या अतुल काळसेकर यांच्या कार्यवृत्तांताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. वेंगुर्ले नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रसन्ना कु बल यांच्या पत्नी स्रेहा कु बल यांनी अनेक महिलांसोबत राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. तर शिवसेनेचे पिंगुळीचे पदाधिकारी संजय परब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.