नाधवडेतील तेलताड प्रकल्पाची चौकशी

By admin | Published: September 10, 2016 11:17 PM2016-09-10T23:17:20+5:302016-09-11T00:26:38+5:30

कृषी सहआयुक्त लोखंडे यांनी कृषी अधिकारी, शेतकरी भोगम यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

Talavdalat Project Inquiries | नाधवडेतील तेलताड प्रकल्पाची चौकशी

नाधवडेतील तेलताड प्रकल्पाची चौकशी

Next

वैभववाडी : नाधवडे येथील तेलताड प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहाराची कृषी विभागाचे सहआयुक्त (ठाणे विभाग) अशोक लोखंडे यांनी शनिवारी चौकशी केली. सहआयुक्त लोखंडे यांनी शेतकरी व तालुका कृषी अधिकारी यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या तेलताड प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहाराची मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी तक्रार केली होती. या प्रकरणाची विधानसभेत लक्षवेधीही झाली होती. नाधवडे येथील रामचंद्र भोगम या शेतकऱ्याने खासगी कंपनीच्या माध्यमातून तेलताड लागवड केली होती. त्यासाठी कृषी विभाग भोगम यांना अनुदान देणार होते. त्यामुळे कृषी विभागाच्या मंजुरीने २0१४-१५ मध्ये भोगम यांनी कोल्हापुरातील खासगी कंपनीमार्फत ६४ हजार रुपये किमतीची तेलताडाची रोपे खरेदी करून लागवड करण्यात आली.
कृषी अधिकाऱ्यांनी मर्जीतील शेतकऱ्यांना हाताशी धरून बनावट दस्तऐवज (एम बी रेकॉर्ड) कृषी विभागाने तयार करून तेलताड प्रकल्पाच्या नावाखाली शासनाची फसवणूक केल्याची तक्रार मनसेचे सचिन तावडे यांनी केली होती.
तावडे यांच्या तक्रारीनुसार विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाची लक्षवेधी झाली होती. त्यामुळे तावडे यांच्या सहआयुक्त लोखंडे यांनी शनिवारी नाधवडेचा दौरा करून तेलताड प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, पर्यवेक्षक दळवी, विवेकानंद नाईक, तक्रारदार मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, सरपंच दादा पावसकर, आदी उपस्थित होते. कृषी सहआयुक्त लोखंडे यांनी कृषी अधिकारी, शेतकरी भोगम यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
दरम्यान, कृषी सहआयुक्त लोखंडे यांनी शेतकरी व कृषी अधिकारी यांच्या नोंदवलेल्या जबाबात शेतकरी रामचंद्र भोगम यांनी तेलताड लागवड केली होती. परंतु, तेलताड प्रकल्पाची प्रेरक खासगी कंपनी किंबहुना कृषी विभागाने भोगम यांना एक रुपयाही अनुदान दिले नसल्यामुळे भोगम यांनी तेलताड लागवड केलेल्या जमिनीवर मशागत करून यावर्षी ऊस लागवड केली आहे. त्यामुळे तेलताड लागवड केली असे शेतकरी भोगम यांचे म्हणणे असले तरी प्रत्यक्ष आता त्या जमिनीवर आता ऊस दृष्टीस पडत आहे. त्यामुळे नाधवडेतील तेलताड प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहारातून काय बाहेर पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांवर हा आहे आरोप
तेलताड प्रकल्पासाठी प्रेरक खासगी कंपनीच्या पुढाकारातून शासन शेतकऱ्याला अनुदान देणार होते. ते अनुदान रामचंद्र भोगम यांना मिळावे यासाठी कृषी विभागाने त्यांच्या कथित तेलताड लागवडीचे रेकॉर्ड केले होते. परंतु आजमितीस या शेतकऱ्याला शासनाचा एक रुपयासुद्धा मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु प्रकल्पाच्या त्या जमिनीवर तेलताडाऐवजी ऊस दिसत असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी खोटे दस्तऐवज बनवून शासनाची फसवणूक केल्याचे सचिन तावडे यांचे म्हणणे आहे.

Web Title: Talavdalat Project Inquiries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.