तिलारी नदीपात्रात सापडले बिबट्याचे धड

By admin | Published: September 1, 2016 12:35 AM2016-09-01T00:35:34+5:302016-09-01T00:39:06+5:30

अवयवांच्या तस्करीचा संशय : कुडासे-जाधववाडी येथील घटना; पंजे, शिर छाटून बिबट्याला फेकले नदीत

The tale of the leopard found in the Tillari river bed | तिलारी नदीपात्रात सापडले बिबट्याचे धड

तिलारी नदीपात्रात सापडले बिबट्याचे धड

Next

दोडामार्ग : कुडासे-जाधववाडी पुलाजवळ तिलारी नदीपात्रात पंजे व शिर छाटलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्याची अज्ञातांनी शिकार करून पंजे, शिर छाटल्यानंतर धड नदीपात्रात फेकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिबट्याच्या दात व नखांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने यामागे प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारे रॅकेट असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कुडासे-जाधववाडी पुलावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तिलारी नदीपात्रात शिर छाटलेल्या अवस्थेत एक मृत बिबट्या पुलाला अडकल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती वनविभागाला कळविताच वनक्षेत्रपाल सचिन आठवले, वनपाल चंद्रकांत खडपकर, वनरक्षक म. ल. नाईक, शिवाजी रेडकर, संंजय नीळकंठ, विलास साळकर, सुरेश आईर आदी घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर या मृत बिबट्याला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. यावेळी बिबट्याचे पंजे व मुंडके नसल्याचे आढळून आले. त्यामुळे बिबट्याची शिकार करून त्याच्या अवयवांची तस्करी केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)


दोन वर्षांपूर्वीही झाली होती शिकार
दोन वर्षांपूर्वी तालुक्यात वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात होता. काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे अवषेशही आढळले होते. मात्र, मागील दोन वर्षांत वनविभागाच्या धडक कारवाईमुळे हे प्रकार थांबले होते; पण बुधवारी शिर व पंजे नसलेला मृत बिबट्या आढळल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मृत बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र, हा बिबट्या गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नदीपात्रात असण्याची शक्यता आहे. त्याचे शिर व पंजे मगरींनी खाल्ले असावेत किंवा ते सडले असावेत.
- सचिन आठवले (वनक्षेत्रपाल)

Web Title: The tale of the leopard found in the Tillari river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.