तळवडे ग्रामपंचायतीसमोर अशोक राऊळ यांचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:25 PM2019-02-09T12:25:40+5:302019-02-09T12:34:10+5:30
तळवडे ग्रामपंचायत दप्तरी वडिलोपार्जित घराची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र त्या जागेवर घर दिसत नसल्याने या अजब कारभाराचा घर हरवले आहे अशा शब्दात निषेध करीत मळगाव-ब्राम्हणपाट येथील अशोक शत्रुघ्न राऊळ यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेले घर गायब कसे झाले, याचा खुलासा ग्रामपंचायतीने द्यावा, अशी राऊळ यांची मागणी आहे.
तळवडे : ग्रामपंचायत दप्तरी वडिलोपार्जित घराची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र त्या जागेवर घर दिसत नसल्याने या अजब कारभाराचा घर हरवले आहे अशा शब्दात निषेध करीत मळगाव-ब्राम्हणपाट येथील अशोक शत्रुघ्न राऊळ यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेले घर गायब कसे झाले, याचा खुलासा ग्रामपंचायतीने द्यावा, अशी राऊळ यांची मागणी आहे.
याबाबत राऊळ यांनी सांगितले की, माझे वडील शत्रुघ्न राऊळ यांच्या नावावर इमारत क्र. ३५९ ही घराची मालमत्ता होती. पण सद्यस्थितीत ती मालमत्ता गायब होऊन त्या ठिकाणी दुसरीच इमारत कशी काय उभी राहिली? त्याच ठिकाणी आपला भाऊ महादेव राऊळ यांनी इमारत उभारली असून, एकाच जागेवर दोन इमारत नंबर दिसत आहेत. यामागचे गौडबंगाल काय? याचा खुलासा ग्रामपंचायतीने करावा.
या मागणीसाठी आपण वारंवार उपोषणे केली. मात्र अद्यापही न्याय न मिळाल्याने आमरण उपोषण सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत ग्रामपंचायतीकडून खुलासा मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशाराही राऊळ यांनी दिला.
याबाबत न्याय मिळण्यासाठी राऊळ यांनी २६ जानेवारी रोजीही उपोषण केले होते. मात्र यावर तोडगा काढण्याच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले होते. मळगाव ग्रामपंचायत अंतर्गत पेटलेल्या या वादात आतापर्यंत पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले आदींनी मध्यस्थी केली, मात्र अद्यापही हा वाद मिटत नसल्याने उपोषणकर्ते अशोक राऊळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
अशोक राऊळ यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयही उपोषणास बसले असून, मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गुरूनाथ गावकर, माजी सरपंच निलेश राऊळ, हनुमंत पेडणेकर, माजी कामगार अधिकारी शेखर पाडगावकर व ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, यासंदर्भात सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता राऊळ यांच्या घराविषयी नियमाप्रमाणे कार्यवाही केल्याचे त्यांनी सांगितले.