स्टॉल हटविण्यास आलेल्यांना खडेबोल. २४ तासांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 03:28 PM2021-02-25T15:28:14+5:302021-02-25T15:34:46+5:30
Sawantwadi Sindhudurgnews-सावंतवाडी नगरपालिकेने नगरविकास विभागाचे आदेश धाब्यावर बसविल्याने अखेर रवी जाधव यांनी स्वत:च मंगळवारी गांधी चौकात स्टॉल उभारला. त्यानंतर बुधवारी नगरपालिका कर्मचारी हा स्टॉल हटविण्यासाठी पोलिसांना घेऊन पोहोचले;अधिकाऱ्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला; पण जाधव हे न ऐकल्याने अखेर ते निघून गेले.
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेने नगरविकास विभागाचे आदेश धाब्यावर बसविल्याने अखेर रवी जाधव यांनी स्वत:च मंगळवारी गांधी चौकात स्टॉल उभारला. त्यानंतर बुधवारी नगरपालिका कर्मचारी हा स्टॉल हटविण्यासाठी पोलिसांना घेऊन पोहोचले; मात्र जाधव यांनी पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना खडेबोल सुनावत, माझ्याकडे दोन-तीन लाख तुम्हांला देण्यास नसल्यानेच तुम्ही माझा स्टॉल काढण्यास आला, इतर अनधिकृत स्टॉल कसे काय उभे ठेवले? असा सवाल केला. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला; पण जाधव हे न ऐकल्याने अखेर ते निघून गेले.
सावंतवाडी नगरपालिकेने रवी जाधव यांचा स्टॉल हटविल्यानंतर पालिका व जाधव यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. याविरोधात जाधव यांनी उपोषणही केले होते. त्यानंतर नगरविकास विभागाने जाधव यांना तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल दिला जावा, असे आदेश दिले; पण या आदेशाची कोणतीही अंमलबजावणी पालिकेकडून न झाल्याने अखेर मंगळवारी जाधव यांनी गांधी चौकात स्टॉल उभारला. मात्र, हा स्टॉल अनधिकृत असल्याने पालिकेच्यावतीने जाधव यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती.
हा प्रकार ताजा असतानाच, बुधवारी सायंकाळी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी जाधव यांचा स्टॉल काढण्यासाठी गांधी चौकात आले, तत्पूर्वी जाधव यांना नोटीसही बजाविण्यात आली होती. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी आल्यानंतर त्यांनी जाधव यांचा स्टॉल काढण्यास घेतला असता, त्याला त्यांनी विरोध केला. यावेळी पालिकेकडून जाधव यांना २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. यावेळी पालिकेला पोलीस बंदोबस्तही पुरविण्यात आला होता.
एकही व्यक्ती आतमध्ये आला, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. मी गप्प बसणार नाही. अनेकांकडून पैसे घेऊन स्टॉल लावण्यास दिले; पण मी गरीब आहे. त्यामुळेच मला स्टॉल लावण्यास दिला नाही, मला त्रास दिला जात आहे. पण मी आता गप्प बसणार नाही. अधिकारी व कर्मचारी यांनी मला त्रास दिल्यास पोलिसांत तक्रार देईन. आम्हांला बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना शिकवली, त्यानुसारच मी काम करेन, माझा स्टॉल काढला तर अनधिकृत सगळे स्टॉल काढा.
-रवी जाधव, स्टॉलधारक