तळवडे शाळा जिल्ह्यातील पहिली डिजिटल स्कूल
By admin | Published: June 28, 2015 10:33 PM2015-06-28T22:33:36+5:302015-06-29T00:29:16+5:30
शिक्षण विभाग : शाळेत अवतरले संगणक युग...
रहिम दलाल-रत्नागिरी --विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून अध्यापनाचे धडे देण्यासाठी ग्रामीण भागातील तळवडे शाळा क्रमांक १ ही जिल्हा परिषदेची पहिली शाळा डिजिटल स्कूल करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी रुजू झाल्यावर दोन महिन्यांतच जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शिक्षण विभागाने केली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मोठा आधार लाभणार आहे.
जिल्हा परिषदेच्या २७८६ प्राथमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळांची स्थिती पाहता १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळा १६६ आणि ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ३०८ आहे. त्यामुळे या शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असतानाही विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याने भविष्यात या शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
संगणक युग असल्याने विद्यार्थ्यांचा त्याचा वापर शालेय जीवनापासून व्हावा, त्यादृष्टीने नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दूरदृष्टी समोर ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळांनाही डिजिटल स्कूल बनविण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्हा परिषदेच्या २५१ केंद्रशाळांमध्ये डिजिटल स्कूल ही संकल्पना राबवण्यात येणार असून, त्याची सुरुवात चिपळूण तालुक्यातील तळवडे शाळा क्रमांक १ मधून करण्यात आली आहे.
ही शाळा इयत्ता पहिले ते आठवीपर्यंत आहे. तळवडेतील शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन डिजिटल स्कूल करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्वांनी मिळून लोकवर्गणीतून २ लाख रुपये गोळा केले. संगणक वर्गखोली बांधून संगणक, एलसीडी प्रोजेक्टर व सॉफ्टवेअर यासाठी ८० हजार रुपये खर्च करुन ते खरेदी करण्यात आले. त्यामुळे ही शाळा डिजिटल स्कूल झाली.+
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये अध्यापनाचे धडे देण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात तळवडे शाळा क्रमांक १ मधून झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मुलांना विद्यार्थीदशेतूनच संगणक हाताळता येणार असून, शाळांचा शैक्षणिक दर्जाही सुधारणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा भविष्यात डिजिटल स्कूल करण्यासाठी भर दिली जाणार आहे.
- एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी,
जिल्हा परिषद, रत्नागिरी.