तारकर्ली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:40 AM2020-02-13T00:40:44+5:302020-02-13T00:40:51+5:30

मालवण : तारकर्ली ग्रामसभेचे कामकाज पूर्ण केले नाही. इतिवृत्ताला मान्यता दिली नाही तसेच ग्रामस्थांचे प्रश्न जाणून न घेता किरकोळ ...

Tarkarli villagers avoid hitting the Gram Panchayat | तारकर्ली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

तारकर्ली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

googlenewsNext

मालवण : तारकर्ली ग्रामसभेचे कामकाज पूर्ण केले नाही. इतिवृत्ताला मान्यता दिली नाही तसेच ग्रामस्थांचे प्रश्न जाणून न घेता किरकोळ कारणावरून सरपंच स्नेहा केरकर यांनी हेतूपुरस्सर आणि सभेच्या नियमांना धाब्यावर बसवून सभेतून पळ काढला. सरपंचांचा ग्रामपंचायतीत भ्रष्ट व मनमानी कारभार सुरू आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकाराची पंचायत समितीकडून दखल घेण्यात न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तारकर्लीत येऊन आमचे म्हणणे ऐकून घेतल्यावरच ग्रामपंचायतीला ठोकलेले टाळे उघडले जाईल, असे तारकर्ली ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पर्यटन नकाशावर नावारूपाला आलेल्या तारकर्ली गावात ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रथमच संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. बुधवारी दुसºया दिवशीही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
तारकर्ली ग्रामपंचायतीच्या प्रजासत्ताक दिनाची तहकूब झालेली ग्रामसभा मंगळवारी बोलाविण्यात आली होती. ग्रामसभा सुरू झाल्यावर मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सचिवांकडून सुरू असताना त्यांचा आवाज मागच्या ग्रामस्थांपर्यंत जात नसल्याने एका ग्रामस्थाने मोठ्याने इतिवृत्त वाचन करण्याची विनंती केली. या विनंतीस सभाध्यक्ष सरपंच स्नेहा केरकर यांनी आक्षेप घेत नियमांवर बोट ठेवत त्या ग्रामस्थास तुम्ही मतदार नसल्याने सभेत बोलू नये, असे सांगितले. त्यावरून ग्रामस्थ व सरपंचांच्यात निर्माण झालेल्या वादात सरपंच केरकर यांनी ही सभा अचानक सोडून जाताना सभात्याग करत असल्याचे सांगितले.
सरपंच सांगत असलेला ग्रामविकास गावात दिसत नाही. अधिकारीवर्गाला पाठीशी घालण्याचे काम ग्रामपंचायतीने केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी दाद कोणाकडे मागायची, हा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होऊन ग्रामपंचायतीला टाळे ठोकले गेले आहे.
यावेळी दादा कुबल, डॉ. बाळा परब, वैभव सावंत, राजू मेस्त्री, भिवा कोळंबकर, अजिंक्य पाटकर, संदेश गोसावी, मेघनाथ मयेकर, संजय खराडे, मृणाली मयेकर, वैष्णवी मेस्त्री, सुप्रिया भोवर, मिथीलेश मिठबावकर, जयवंत सावंत, देवेंद्र खवणेकर, घनश्याम कुबल, नंदकुमार टिकम, बजरंग कुबल, निवृत्ती कोळंबकर आदी व इतर ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
ग्रामसभेचे कामकाज पूर्ण न होताच सरपंचांनी सभात्याग केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीमध्येच ठाण मांडले. या दरम्यान त्याठिकाणी आलेल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांच्या प्रश्नांचे समाधान झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ग्रामपंचायतीत ठाण मांडून अखेर सरपंच न फिरकल्याने ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.

Web Title: Tarkarli villagers avoid hitting the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.