‘तारली’ जाळ्यात शिरली
By Admin | Published: December 9, 2015 01:09 AM2015-12-09T01:09:43+5:302015-12-09T01:11:19+5:30
मालवण किनारपट्टी गजबजली : ३५ हजारांपर्यंत एका खंडीला भाव ं७
मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही महिने मत्स्य दुष्काळाचे सावट असताना गेले दोन दिवस मालवण किनारपट्टीवर ‘तारली’ मासळीची बंपर कॅच मच्छिमारांच्या जाळ्यात सापडत आहे. गेले काही दिवस सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सिगलचे आगमन झाले असून, मासळीच्या बंपरसाठी शुभ संकेत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.
दरम्यान, किनारपट्टीवरील अनेक रापण संघांना मिळून २५ ते ३० खंडीच्यावर तारली मासळी मिळाली आहे. या मासळीला १२ हजारांपासून ३५ हजार रुपये खंडी असा चांगला दर मिळत असल्याने दर्याराजा मच्छिमार सुखावला आहे.
मंगळवारी सकाळी मेस्त रापण संघ, नारायण तोडणकर रापण संघ या दोघांनाही मोठ्या प्रमाणात अपेक्षित मासळी मिळाली. या मोठ्या आणि चांगल्या तारलीची निर्यात मुंबई, पुणे, बंगलोर या ठिकाणी केली जाते. तारलीपासून तेलही काढले जात असल्याने या मासळीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे रापणकरांनी किनारपट्टी गजबजली आहे. (प्रतिनिधी)
अतिक्रमण थांबल्याने मासळी जाळ्यात
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही दिवस मच्छिमारांत संघर्ष सुरू होता. त्यानंतर हायस्पीड व अनधिकृत पर्ससीन यांचे अतिक्रमण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर थांबले आहे. त्याचाच परिणाम म्हणून अशा पद्धतीने बंपर स्वरूपात मासळी मिळत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. मात्र, गेले अनेक महिने तुटपुंजी मासळी मिळत असताना मिळालेली ही तारली मासळी बंपर असली तरीही पुरेशी नाही. गेल्या अनेक महिन्यांत रापण व्यवसाय नुकसानीतच आहे. ते नुकसान या मासळीमुळे भरून येणार नाही, असेही मच्छिमारांनी सांगितले.