प्रशासनावर ओढले ताशेरे

By admin | Published: May 27, 2016 10:27 PM2016-05-27T22:27:50+5:302016-05-27T22:28:20+5:30

समाजकल्याण समिती सभा : प्रशासनाला घरचा आहेर ; कर्मचाऱ्यांना खडेबोल

Tashera on the administration | प्रशासनावर ओढले ताशेरे

प्रशासनावर ओढले ताशेरे

Next

सिंधुदुर्गनगरी : जिल्हापरिषद सर्वसाधारण सभा होऊन तीन महिने होत असताना ३ टक्के अपंग निधीच्या विविध योजनांची निश्चितीच झालेली नाही. जिल्हापरिषद प्रशासनाने अद्याप समाजकल्याण विभागाला योजना दिल्या नाहीत. समाजकल्याण विभागाचे सचिव वारंवार बदलत असल्याने धोरणात्मक निर्णय होत नाहीत. म्हणून प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे आपण या ठिकाणी बसायला इच्छुक नाही, असे सत्ताधारी पक्षाचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सभेत स्पष्ट करत प्रशासनाला घरचा आहेर दिला. जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची मासिक सभा सभासद अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य सुकन्या नरसुले, निकिता तानवडे, आस्था सर्पे, समिती सचिव एस. बी. शिरसाट, अधिकारी, खातेप्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. अपंगांसाठी यावर्षी नवीन २२ योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे मागील जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरले असतानाही अद्याप या योजना का तयार केल्या नाहीत? असा सवाल सभापती अंकुश जाधव यांनी समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना विचारला. जिल्हापरिषद प्रशासनानेच अद्याप समाजकल्याण विभागाला योजना दिलेली नसल्याचे समोर येताच अंकुश जाधव आक्रमक बनले.
तुमचा पाठपुरावा कमी पडल्याने अद्याप योजना तयार झाल्या नाहीत. जबाबदारी पेलता येत नसेल तर पदाचा राजीनामा द्या व घरी बसा, आमच्यावर उपकार करत नाही आहात, असे खडेबोल समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना सुनावले.
समिती सचिव वारंवार बदलने, प्रशासनाचे सहकार्य नसणे आदी गोष्टींबाबत सभापती अंकुश जाधव यांनी चीड व्यक्त करत मी या ठिकाणी बसायला इच्छुक नसल्याचे थेट सभागृहात सांगून टाकले. (प्रतिनिधी)


अपंग शिष्यवृत्ती ; सखोल चौकशीचे आदेश
शालेय अपंग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती अद्यापपर्यंयत संबंधित लाभार्थ्यापर्यंत का पोहचली नाही? असा सवाल समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केला. शासनाने यासाठी एकही पैसा दिला नसल्याचे संबंधीत अधिकाऱ्याने सांगितले. अपंग शिष्यवृत्ती लाभार्थीचे खरोखरच प्रस्ताव मागितले होते का? याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही सभापती अंकुश जाधव यांनी सचिवांना दिले.

सुकन्या नरसुले : अंकुश जाधव यांचा मंद कारभार
जिल्हापरिषद सर्वसाधारण सभेत अपंगांच्या २२ योजना बनविण्याचा ठराव झाला. सभा होऊन तीन महिने होत आले तरी योजना बनविण्यात आलेल्या नाहीत. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे समाजकल्याण सभांवर बहिंष्कार घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यावर सभापती अंकुश जाधव यांचा वचक नसून कारभार मंद चालला असल्याचा आरोप सदस्या सुकन्या नरसुले यांनी भर सभेत केला.

Web Title: Tashera on the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.