अवैद्य वृक्षतोड बंदीसाठी वन विभागाकडून टास्क फोर्स, सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यांतील बारा गावांत बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:57 PM2024-10-21T15:57:08+5:302024-10-21T15:57:27+5:30
सावंतवाडी : दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांतील एकूण १२ गावांमध्ये वृक्षतोडीला बंदी घालण्यात आली असून, अवैधरीत्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ...
सावंतवाडी : दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांतील एकूण १२ गावांमध्ये वृक्षतोडीला बंदी घालण्यात आली असून, अवैधरीत्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘टास्क फोर्स समिती’ तयार करण्यात आली आहे.
या समितीत महसूल, वन व पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी असून, सदस्य सचिव सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे आहेत. तसेच समितीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, दोडामार्गच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली मंडल, सावंतवाडीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा वानरे, आंबोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित कटके, सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, दोडामार्गचे पोलिस निरीक्षक हे सदस्य आहेत.
दरम्यान, सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीतर्फे कळविण्यात येते की, दोडामार्ग तालुक्यात कोठेही गावात खासगी मालकी किंवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होताना निदर्शनास आल्यास या घटनेबाबत जनतेने गावातील पोलिस पाटील, वनरक्षक, तलाठी यापैकी कोणालाही तातडीने कळवावे. जेणेकरून वन विभागाकडील अधिकारी वा कर्मचारी घटनास्थळी जाऊन तत्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करतील.
तसेच अशा चौकशी प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षतोडीबाबत ऑनलाइन तक्रारीसाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीचा ई-मेल आयडी तयार करण्यात आलेला आहे.
याबाबतची माहिती देण्यासाठी ई-मेलवर वृक्षतोडीच्या घटनेबाबत तक्रार दाखल करता येते. तसेच वृक्षतोडीबाबत तक्रारीसाठी सावंतवाडी वन विभाग यांच्याकडे दूरध्वनीव्दारेही तक्रार दाखल करता येणार आहे. यासाठी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.