कासव जत्रा ठरतेय लक्षवेधी

By admin | Published: January 19, 2015 11:30 PM2015-01-19T23:30:54+5:302015-01-20T00:55:27+5:30

वायंगणीवासियांना मिळतोय हंगामी रोजगार : पर्यटकांना जिल्ह्यातील विविधता पाहण्याची संधी

Taskatra Jaitra decides to focus on | कासव जत्रा ठरतेय लक्षवेधी

कासव जत्रा ठरतेय लक्षवेधी

Next

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले-सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनातून समृध्दीकडे नेण्यासाठी अनेक पर्याय शोधले जात आहेत. त्यातील वायंगणी येथील कासव जत्रा हा उपक्रमही स्थानिकांना हंगामी रोजगार उपलब्ध करुन देत असल्याने विशेष लक्षवेधी ठरत आहे. यातून स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार संधी मिळतेच आहे त्यासोबतच देशी विदेशी पर्यटकांनाही जिल्ह्यातील विविधता पाहण्याची संधी प्राप्त होत आहे. आजपर्यंत सिंधुदुर्ग हा प्रामुख्याने हापूस आंबा, काजू, फणस व कोकमच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. आणि आता मात्र, या सर्वांच्या जोडीला सिंधुदुर्गची नव्याने ओळख निर्माण होत आहे ती म्हणजे वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे होणाऱ्या ‘कासव जत्रेने’.सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आणि इथल्या समुद्रकिनाऱ्यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. इथले स्वच्छ, सुंदर व शांत समुद्रकिनारे देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करू लागले आहेत. त्यामुळे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी व मनाचे मनोरंजन करण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. ‘पर्यटन’ या उपक्रमात स्थानिकांचा सहभाग वाढावा, त्यांना रोजगार मिळावा, यासाठी वायंगणी ग्रामस्थांच्या पुढाकाराने किरात ट्रस्टतर्फे ‘कासव जत्रा’ हा अभिनव उपक्रम केली तीन वर्षे वायंगणी किनाऱ्यावर आयोजित केला जात आहे.
‘आॅलिव्ह रिडले’ या जातीची कासवे दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात वायंगणी येथील समुद्र किनाऱ्यावर अंडी घालतात. या अंड्यांपासून बनविलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मागणी असल्याने अंडी चोरीला जाऊ नयेत, यासाठी गावकरी या अंड्यांची विशेष काळजी घेतात. अंड्यांच्या ठिकाणी जाळी बसवतात. ५५ ते ६० दिवसांनी पिल्ले बाहेर येतात. पर्यटकांना या कासवांच्या जन्मसोहळ्याचा आनंद लुटता यावा यासाठी ‘कासव जत्रे’चे आयोजन केले जाते.
कासव जत्रेला येणाऱ्या पर्यटकांची राहण्या-जेवण्याची सोय गावातील ग्रामस्थांकडे केली जाते. ग्रामस्थही पर्यटकांना आपलेपणाची वागणूक देऊन त्यांचे आदरातिथ्य करतात. त्यांना इथले चविष्ट मासे, कोकणी गोड पदार्थ तसेच न्याहारी आंबोळी-चटणी, वडे-उसळ, तांदळाच्या पिठापासून बनणाऱ्या शेवया असे पौष्टिक पदार्थ महिला बचतगट उपलब्ध करून देत असल्याने पर्यटकांना इथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता येतो. तसेच त्यांची राहण्याची सोयही इथल्या घरात व घरासमोरील मंडपात केली जाते. त्यामुळे पर्यटकांना ग्रामीण जीवन अनुभवता येते. कासव जत्रा या उपक्रमामुळे स्थानिक लोकांना, महिलांना रोजगार मिळाल्याने उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून आपला विकास साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
येथे आलेल्या निसर्गप्रेमी पर्यटकांना डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारी, जंगलातील पशुपक्षी, वनौषधी झाडांची माहिती देण्याबरोबरच सायंकाळच्या वेळेला इथल्या संस्कृतीची ओळख करून देणारे दशावतार, गोफनृत्य, फुगडी असे मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवले जातात. या पर्यटनपूरक उपक्रमामुळे कोकणातील खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा प्रसार व प्रचार होण्यास मदत होते.

जत्रेचे वेगळेपण
वायंगणी येथील कासव जत्रेत स्थानिकांच्या हस्तकलेला वाव मिळण्यासाठी वाळूशिल्प साकारणी, कुंभार कलेचे प्रात्यक्षिक, ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या चित्रकलेचे प्रात्यक्षिक अशा उपक्रमांनी कासव जत्रेचे वेगळेपण अधोरेखित होते.

Web Title: Taskatra Jaitra decides to focus on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.