वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवर कंपनीकडून सर्व्हे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:29 PM2020-09-02T16:29:44+5:302020-09-02T16:31:23+5:30
शाळांना सोलर पॅनलच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याची संकल्पना आमदार नीतेश राणे यांनी मांडली आहे. या कामाला आता गती मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने त्यासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे.
कणकवली : शाळांना सोलर पॅनलच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याची संकल्पना आमदार नीतेश राणे यांनी मांडली आहे. या कामाला आता गती मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने त्यासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे.
दोन अधिकारी स्थानिक कर्मचाऱ्यांसह हा सर्व्हे करीत आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग आणि सोलर पॅनल विभागाचे प्रमुख गोविंद ढोले, सौरऊर्जा विभागाचे अभियंता ईशान शहाडे यांच्या उपस्थितीत हे सर्व्हेचे काम सुरू आहे. सोमवारी टाटा पॉवरच्या या अधिकाऱ्यांनी आमदार राणे यांची कणकवली येथे भेट घेतली.
आमदार राणे यांनी सोलर पॅनलच्या माध्यमातून शाळांना सौरऊर्जा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून शाळांना अखंडित वीजपुरवठा होईल. त्याचप्रमाणे वीज बिलापोटी शाळांचा होणारा खर्च कमी होईल.
यापूर्वी आमदार राणे यांनी मतदार संघातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम राबविला आहे. त्याच पद्धतीने हा दुसरा उपक्रम आहे. समाज शिक्षणातून घडतो आणि हे शिक्षण दर्जेदार असावे त्यासाठीच्या सर्वतोपरी सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यावर आमदार राणे यांचा भर आहे.