Tauktae Cyclone Updates: 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री पालकमंत्री उदय सामंत पोलीस ठाण्यात पोहचले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 05:08 AM2021-05-16T05:08:22+5:302021-05-16T05:10:53+5:30
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री वेगुर्लेत, मध्यरात्री पोलीसांकडून आढावा
सिंधुदुर्ग: तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वेगुर्ले पोलीस ठाण्याला भेट देऊन सद्य:स्थितीची माहिती घेतली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत यांनी वेगुर्ले समुद्र किनारी पोलीसांकडून कशा प्रकारे तयारी सुरू आहे तसेच अतिरिक्त पोलीस कुमक कशा प्रकारे ठेवण्यात आली नुकसान होऊ नये यासाठी काय उपाय योजना करण्यात आल्या यांचा आढावा यावेळी घेत पोलिसाना सुचना केल्या आहेत.
‘तौत्के’ चक्रीवादळाचा शनिवारी सकाळी ताशी ७ किमी होता. त्यानंतर दुपारी ते ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकत आहे. तेव्हा ते पणजीपासून २५० किमी, मुंबईपासून ६२०, गुजरातमधील वेरावळपासून ८५० किमी दूर होते. शनिवारी सायंकाळी चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून वार्याचा वेग ताशी ९५ ते १०५ किमीवर पोहचला आहे. उद्या रविवारी सायंकाळी या चक्रीवादळाचे अति तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. यावेळी त्याच्या वार्याचा वेग ताशी १२५ ते १४५ किमीपर्यंत पोहचणार आहे. रविवारी व सोमवारी या दोन्ही दिवशी हे चक्रीवादळ समुद्रातच अति वेगवान होत गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. त्यानंतर १८ मे रोजी सकाळी अथवा दुपारी ते गुजरातमधील पोरबंदर आणि नालिया दरम्यान जमिनीवर धडकणार आहे. जमिनीवर धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होत जाणार असून १९ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत त्याचा परिणाम जाणवत राहणार असून हे चक्रीवादळ गुजरातमधून पुढे राजस्थान व पाकिस्तानपर्यंत वाटचाल करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.