तावडे स्मारक युवा पिढीला स्फूर्तीदायक
By admin | Published: June 5, 2015 11:47 PM2015-06-05T23:47:40+5:302015-06-06T00:24:21+5:30
दीपक केसरकर : शिरगावमध्ये शहीद सुरबा तावडे स्मारकाचा लोकार्पण सोहळा
शिरगांव : सिंधुदुर्ग जिल्ह्याला शूरवीरांची दैदीप्यमान परंपरा आहे. शहीद सी-हवालदार सुरबा तावडे यांचे स्मारक युवा पिढीला स्फूर्तीदायक ठरले. यातूनच देशसेवेसाठी नवीन जवान तयार होतील. हे स्मारक शौर्य, कर्तृत्व व त्यागाचे प्रतिक आहे. यातूनच नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिरगांव येथे व्यक्त केले.
सन १९१४-१५ च्या पहिल्या महायुद्धात केनिया येथे शहीद झालेले शिरगांव गावचे सुपुत्र सी-हवालदार सुरबा तावडे यांच्या शूरवीर शहीद (अमर जवान) स्मारकाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी ग्रुप ग्रामपंचायत शिरगांव शेवरेच्या प्रांगणात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर आपल्या बौद्धीकतेचा ठसा उमटविलेला आहे. याला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास जिल्ह्यातून आएएस, आयपीएस अधिकारीही निर्माण होतील. यासाठी लवकरच मार्गदर्शन केंद्र जिल्ह्यात सुरु करणार आहोत. देवगड तालुका हा नैसर्गिक साधन सामुग्रीने राज्यात प्रथम क्रमांकाचा संपन्न तालुका आहे. त्याच्या विकासासाठी सूक्ष्म नियोजन केले जाणार असून जिल्ह्यात २० कोटीची अत्याधुनिक राईस मिल उभारली जाईल. या विकासांमध्येही शहीदांची आठवण स्फूर्तीदायक आहे. त्यांनी अंगी बाळगलेली शिस्त ही जीवनामध्ये खूप महत्वाची आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना अरुण कर्ले म्हणाले की, गावचा इतिहास कौतुकास्पद असून हाच वारसा सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे. यासाठी युवा पिढीने एकत्र येणे गरजेचे आहे. आपआपली मते मांडा, एकजुटीने काम करा. गावचा सर्वांगीण विकास दूर नाही.
शहीद सी-हवालदार सुरबा तावडे यांच्या अमर जवान स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री दीपक केसरकर, अरुण कर्ले, सरपंच अमित साटम, उपसरपंच संजय जाधव, पंचायत समिती सदस्य रवींद्र जोगल, सदानंद देसाई, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुगंधा साटम, सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, रश्मी कर्ले, अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, तहसीलदार जीवन कांबळे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, शशिकांत कदम, शहीद सी-हवालदार सुरबा तावडे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद तावडे, गणपत तावडे, श्रीपत तावडे, कॅप्टन किरण तावडे, दिगंबर तावडे, पंडित तावडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धोपटे, महेश चौकेकर, स्वरूपा चव्हाण, माजी प्राचार्य विजयकुमार कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल सावंत यांनी, सूत्रसंचालन अनुजा चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार कॅप्टन किरण तावडे यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रामाणिक काम करा : शशिकांत कदम
किर्तीचक्र मनिष फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कदम म्हणाले की, संकटकाळी प्रत्येकाला प्रथम देव आठवतो. देशावर संकट येते तेव्हा ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता अहोरात्र देशाचे रक्षण करणारा सैनिक आठवतो. म्हणूनच सैनिक हे देवाचे रुप आहे. हे अमर जवान स्मारक हे गावच्या शौर्याचा अमूल्य ठेवा आहे. गावातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सैन्यात दाखल व्हा. राष्ट्रप्रेमाची ज्योत हृदयात कायम तेवत ठेवा. सैनिकांच्या त्याग व बलिदानाची आठवण ठेवा. कुठल्याही क्षेत्रात वावरत असताना शिस्तबद्ध, प्रामाणिकपणे व कष्टाने काम करा ही पण देशसेवाच आहे.