पर्यटकांकडून कर आकारणी सुरू
By admin | Published: December 29, 2016 12:25 AM2016-12-29T00:25:41+5:302016-12-29T00:25:41+5:30
देवबाग ग्रामपंचायतीने केला शुभारंभ : पहिल्याच दिवशी तीन हजार रूपयांची वसुली
मालवण : शासनाच्या परवानगीनंतर पर्यटकांकडून कर आकारणी करण्याचा प्रारंभ देवबाग ग्रामपंचायतीच्यावतीने बुधवारी करण्यात आला. जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायत क्षेत्रात पर्यटन कर आकारणीस महिन्याभरापूर्वी परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पर्यटकांकडून कर आकारणी करण्याचा बहुमान मिळवणारी देवबाग पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. यापैकी केवळ किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रवासी बोटीने तिकीट आकारणी करून जाणाऱ्या पर्यटकांची नोंद शासन दरबारी ठेवली जाते. मात्र किनारपट्टी व अन्य गावात दाखल होणाऱ्या पर्यटकांची नोंद शासनाकडे निश्चित स्वरूपात नसते. याबाबत शासनाने लक्ष देताना पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांची नोंद व्हावी तसेच पर्यटन सुविधा उपलब्ध देण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे या हेतूने १६ ग्रामपंचायत क्षेत्रात पर्यटन कर वसुलीस शासनाने ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम २००४ च्या नियम २ व १९६० च्या नियम १४५ उपनियम (१) नुसार परवानगी दिली आहे. मालवण तालुक्यातील देवबाग, तारकर्ली, तळाशील-तोंडवळी व वायरी (किल्ले सिंधुदुर्ग क्षेत्र) या चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यापैकी देवबागमध्ये सुरूवात झाली असून अन्य ग्रामपंचायतीच्यावतीने कर आकारणीबाबत जोरदार हालचाली सुरु आहेत. बुधवारी देवबाग सरपंच उल्हास तांडेल, ग्रामसेवक युवराज चव्हाण, उपसरपंच तमास फर्नांडीस, पर्यटन व्यावसायिक रमेश कद्रेकर, बाबू बिरमोळे, मनोज खोबरेकर, मुख्याध्यापक व्ही. व्ही. रावले, पोलिस पाटील भानुदास येरागी, प्रिती चोपडेकर, शर्मिला राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कर वसुलीसाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
तारकर्ली-देवबाग मार्गावर कर्ली नदी किनाऱ्यावर देवबाग गावाच्या हद्दीवर कर आकारणीस सुरवात करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात महामार्गावर टोल वसुलीच्या धर्तीवर लाठी टाकून कर आकारणी केली जाणार आहे. मात्र सध्य स्थितीत तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था केली आहे.
पर्यटन कर वसुली करताना १२ वर्षांवरील ५ रुपये, १२ वषार्खालील ३ रुपये व सहल विद्यार्थी १ रुपया प्रति व्यक्ती अशी कर आकारणी होणार आहे. सद्यस्थितीत हंगामी स्वरूपात ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत पर्यटन कर आकारणी सुरु राहणार आहे. महिन्याभरात कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त केले जातील. तसेच पर्यटन सुविधातही वाढ केली जाईल, अशी माहिती ग्रामसेवक युवराज चव्हाण यांनी दिली.