सिंधुदुर्ग जिल्ह्यात टीबीमुक्त ग्रामपंचायत मोहिमेला सुरुवात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 27, 2024 06:38 PM2024-02-27T18:38:13+5:302024-02-27T18:39:14+5:30
पात्र ग्रामपंचायतींना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक देणार
सिंधुदुर्ग : केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आता क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. टीबीमुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
या ग्रामपंचायतींचे व्हेरिफिकेशन सुरू असून पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या लवकरच जाहीर केली जाणार आहे. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्यपदक, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव म्हणाले की, केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी आता क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे, तसेच जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय अधिकारी, डॉक्टर आदींचा एक रुग्ण सहाय्यता समूह तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये टीबीमुक्त ग्रामपंचायतीसाठी क्षय रोगाचे निकष पूर्ण केल्यास ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. या उपक्रमात १००० लोकसंख्येमध्ये कमीत कमी ३० टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची थुंकी नमुन्याची तपासणी करायची आहे. त्यामध्ये एक किंवा कमी (निरंक) रुग्ण आढळल्यास ग्रामपंचायत पात्र ठरणार आहे. क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि त्यांच्या योगदानाचे सार्वजनिकरीत्या कौतुक करणे, असे या उपक्रमाचे उद्देश असल्याचे डॉ. हर्षल जाधव यांनी सांगितले.
तसेच या स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्यपदक, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येणार असून या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींचे व्हेरिफिकेशन सुरू असून पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या लवकरच जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.